योग लेखांक – १
पतंजलींनी अष्टांग योगाची रचना करताना त्याची दोन भागात विभागणी केली आहे. अंतरंग आणि बहिरंग! अष्टांग योगातील पहिल्या पाच पायऱ्यांना बहीरंग योग म्हणतात. व वरच्या तीन पायाऱ्यांना अंतरंग योग म्हणतात. बहिरंग योग, बाह्य किंवा स्थूल पातळीवर शरीर व मनास शिस्त लावतो. जसे पावसाच्या अखेरीस शेतकरी शेतीची सर्व मशागत पूर्ण करतो. बियाणे रुजवण्यासाठी जमीन नांगरतो, त्यातील काडीकचरा काढून टाकतो, खते मिसळतो, शेतास वन्य जीवांचा त्रास होऊ नये म्हणून कुंपण घालतो. उद्देश हाच की एकदा का पाऊस सुरू झाला की त्या बियानास विनासायास वर येता यावे. व अगदी जोमदारपणे त्याची वाढ व्हावी. बियाणे उत्तम रुजवण्यासाठी जी पूर्व तयारी करतो तो बहिरंग योग समजा. बहिरंग योग (पुढील ध्यानासाठी) शरीर व मनाची मशागत करतो. आणि पावसाळा म्हणजे अंतरंग योग समजा. एकदा पावसाळा सुरू झाला की मग जमिनीला फारसी हलवा हलव करायची नसते. त्या रोपाला स्वतःहूनच वाढू द्यायचे. अंतरंग योगात पोहचल्यावर आपल्याला काहीच करायचे नसते. आपल्या तनाला आणि मनाला अधिकाधिक निसर्गाच्या हवाली करून आपण निश्चिंत व्हायचे असते. तटस्थपणे त्याकडे फक्त बघायचे असते. आपल्या मुळ पिंडाचा विकास तेव्हाच होतो, ज्यावेळी त्यास आपण निसर्गाच्या (देवाच्या) हवाली करू. हे समजायला सोपे आहे परंतु प्रत्यक्ष आचरणात आणणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी बहिरंग योगाचा अभ्यास चांगला व्हायला हवा. बहिरंग योग म्हणजे साधन पाद. जीवनाच्या प्रवाहात भुलभलय्या प्रमाणे अडकलेल्या मनुष्याला बाहेर काढण्याचे व त्यास सावध करण्याचे काम हा पाद करतो. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्या पाच अंगांचा अभ्यास करायचा असतो. हा अभ्यास करता करता साधकास जीवनाचे उद्दिष्ट लक्षात येते. व अंतरंग योगाच्या दिशेने जाण्यासाठी जे कष्ट होणार असतात त्यासाठीची सहनशीलता ह्या अभ्यासाने शरीर व मनात निर्माण होते. बऱ्याच वेळा सामान्य माणसाच्या किंवा साधकाच्या मनात असे उद्दिष्ट नसते. आणि असले तरी त्यात तीव्रता नसते. अशावेळी बहिरंग योगातील पाच अंगे त्यास मदत करतात. अंतरंग योग म्हणजे प्रचंड एकाग्रता. तिसऱ्या पादात धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तीन अंतरंग साधनांचा विचार केला आहे. या पादास विभूतीपाद असे नाव दिले आहे. कारण असे की ह्या तीन अंगांचे अनुष्ठान करतांना अनेक विभूती म्हणजेच शिद्ध्या प्राप्त होतात. त्याचे स्वरूप विस्ताराने यात सांगितले आहे. ह्या सिद्धी संयमाने प्राप्त होतात. ह्या संयमाचे घटक धारणा, ध्यान आणि समाधी हे आहेत योगाचे असे निश्चित स्वरूप माहित नसल्याने सामान्य योग विद्यार्थ्याचा खूप गोंधळ होतो. बहिरंग योगालाच तो अंतिम योगसाधना समजतो. काहीना तर नियमित आसने केल्याने योग शिकल्याचे समाधान मिळते. काहींना वेगाने हालचाल करणारे प्राणायाम (?) करण्याने मनशांती मिळाल्याचा भास होतो. वास्तविक योग ह्य सर्वांच्या पलीकडे आहे. यम ,नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या बहिरंग योगाच्या पाच पायऱ्या आहेत. योग समजून घेण्यासाठीच्या ह्या प्राथमिक पायऱ्या आहेत. धारणे पासून योगसाधनेला खरी सुरवात होते. शिकणाऱ्यांनी आणि शिकवणाऱ्यांनी याचे भान ठेऊन शिकावे व शिकवावे.
(सूचना :- या संदर्भात कुणाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ ह्या वेळात खाली दिलेल्या फोनवर संपर्क करावा.)
पेडणेकर सर, मंडणगड
📞9420167413