नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंड राजे बंख्त बुलंद शहा यांच्या विधानभवन समोरील पुतळ्याला पुष्पहार घालून केले अभिवादन
राज परिवारातील सदस्यांची उपस्थिती
विजय शेडमाके.
दिनांक ७ डिसेंबर २०२३ नागपूर
नागपूर नगराला वसविणारे, गोंड समाजाचे आराध्य, गोंड राजे बंख्त बुलंद शहा यांच्या सन्मानासाठी आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंड राजे बंख्त बुलंद शहा यांच्या विधानभवन समोरील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करतांना केले. यावेळी राज परिवारातील राजे वीरेंद्र शहा, विनोद मसराम, संतोष आत्राम, जय कुंभारे, प्रशांत कुंभारे, संतोष धुर्वे, गणेश बलवंशी, ललित पवार, प्रफुल्ल धुर्वे, सुमित गेडाम, रितेश गेडाम यांच्या सह नागपूर येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंड राजे बंख्त बुलंद शहा राजघाट सक्करदरा परिसराची दुरावस्था झाली असून तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या परिसराचे सौंदर्यीकरण करुन त्या ठिकाणी गोंड समाजाचे सांस्कृतिक भवन निर्माण व्हावे यासाठी नागपुरातील आदिवासी समाज मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात आपण राज्याचे मा. मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे, उप मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार असून विधानसभेत नागपूर नगरीचे निर्मात्यासाठी , त्यांच्या सन्मानासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार डॉ देवरावजी होळी म्हणाले.