आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे एड्स विषयक पथनाट्याचे विविध ठिकाणी सादरीकरण..

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील एन. एस. एस.च्या स्वयंसेवकांनी एड्स विषयक पथनाट्याचे सादरीकरण विविध ठिकाणी करून सामाजिक प्रबोधन केले. एड्स सप्ताहाच्या निमित्त महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर, २०२३ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीमधील सहभागी विद्यार्थ्यांनी एड्स पासून बचावात्मक उपाय व एड्सची गंभीरता याबाबत समाजाचे लक्ष वेधण्यासाठी घोषवाक्यद्वारे परिसर दणाणून सोडला. महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली रॅली मातृमंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामीण रुग्णालय ते बस स्टॅन्ड पर्यंत काढण्यात आली. इयत्ता ११वी वाणिज्य व संयुक्त या वर्गातील विद्यार्थ्यांनी *'विंचू चावला'* या पथनाट्यातून एड्स या रोगाची लक्षणे, कारणे, उपाययोजना व त्या संदर्भातले कायदे इत्यादी गोष्टी समूहाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय देवरुख या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स बाबतच्या जनजागृतीची समाजाला असलेली गरज अधोरेखित केली. त्याचबरोबर एड्सग्रस्त रुग्णांना लागणारे मानसिक बळ देण्यासाठीही विद्यार्थ्यांनी प्रयत्न कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर हे पथनाट्य महाविद्यालय परिसर, देवरुख एसटी स्टँड, ग्रामीण रुग्णालय देवरुख, शिवाजी चौक इत्यादी अधिक लोकवस्तींच्या ठिकाणी सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एड्सची गंभीरता ज्ञात व्हावी यासाठी विविध वर्गांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विंचू चावला या पथनाट्यासाठी माजी विद्यार्थी प्रा. सुरज जाधव यांनी मार्गदर्शन केले. या पथनाट्यामध्ये गोरक्ष जागूष्टे, व्यंकटेश इंदुलकर, स्नेहा शेट्ये, सई नर, वैभवी चव्हाण, साक्षी हतपले, अस्मिता जवंजाळ, पायल पवार, मानसी चव्हाण, हर्षाली दळवी, वेदिका पानगले आणि रीया कदम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आजच्या युवा पिढीने या रोगाची भयावहता लक्षात घेऊन त्या दृष्टीने आचरण करण्याबाबत आवाहन केले. रॅलीसाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप माने, समुपदेशक वैशाली पुजारी व ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमांस प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे यांचे सहकार्य लाभले. एड्स सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

फोटो- ‘विंचू चावला’ पथनाट्य सादर करताना एन एस एसचे विद्यार्थी स्वयंसेवक.

Exit mobile version