चिपळूण – (प्रमोद तरळ) स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही दलित, पददलित, शोषित, पिडीत, वंचितांची कविता हि एक सामूहिक वेदनेची कविता आहे. वस्तुतः जिथे वेदना असते तिथेच विद्रोहाचा जन्म होतो. म्हणून वेदना ही विद्रोहाची जननी आहे. असे जेष्ठ साहित्यिक भालचंद्र फडके यांचे हे मत आहे. पुढे हीच कविता इथल्या निळया पाखरांच्या भूतकाळातील वेदना व्यक्त करित वर्तमानकाळाच्या परिवर्तनशील क्रांतीच्या वाटेवर वेगाने पावले टाकू लागली. मानवी मुक्तीच्या लढ्याला गती मिळाली. इथल्या प्रतिगामी शक्ती विरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी ती व्यक्त झाली. तिला वाचा मिळाली, ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे! आज प्रत्येक दलित, पददलित, शोषित, पिढीत, वंचितांच्या पाठीशी जशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे, तशी भगवान बुद्धांची ही आहे. कारण भगवान बुद्ध हे सर्वकष क्रांतीचा महामंत्र म्हणून उभे आहेत. नवा संस्कार, नवे जीवनमूल्य, नवा जीवन मार्ग हे कवितेचे बलस्थान आहे. या संकल्पनेतून ६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आणि २५ डिसेंबर स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने तसेच १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील गेली 28 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण, एड्स आदी क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण )या संस्थेच्या वतीने चिपळूण तालुक्यातील कुटरे गावचे सुपरिचित कवी, लेखक, वक्ता, जलसाकार तसेच तालुका, जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनांचे जेष्ठ पदाधिकारी व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील खंदे पुरस्कर्ते स्मृतीशेष अशोक दाजी कदम यांच्या तृतीय स्मृती प्रित्यर्थ ‘एल्गार निळया पाखरांचा ‘ अर्थात ‘नवे पर्व, युवा सर्व’ राज्यस्तरीय सामजिक कविता लेखन स्पर्धा – २०२४ या शीर्षकांतर्गत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा निःशुल्क व सर्व समाज घटकांकरीता खुली आहे. या कविता लेखन स्पर्धेकरिता प्रामुख्याने आजच्या नव्या पिढीतील अर्थात नव्या पर्वातील सर्व युवा कवी / कवयित्रीनी आपल्या सामजिक आशय, विषयांच्या कोणत्याही काव्य प्रकारातील दोन कविता सुवाच्च अक्षरात किंवा टंकलेखन (टाईप) करून पाठवाव्या. तसेच एका स्वतंत्र कागदावर संपूर्ण नाव, गावचा पत्ता, संपर्क पत्ता, शिक्षण, व्यवसाय, छंद, मोबाईल नंबर, व्हॉटस अप नंबर लिहावा. स्पर्धेतील सर्वोत्तम पाच विजेत्या स्पर्धकांना स्मृतीशेष अशोक कदम स्मृती प्रित्यर्थ ‘क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक काव्यलेखन सन्मान २०२४’ पुरस्काराने संस्थेच्या खास समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व कवी/ कवयित्रीनी ‘एल्गार निळ्या पाखरांचा…अर्थात नवे पर्व, युवा सर्व -२०२४’ या शीर्षकांतर्गत आकर्षक स्वरूपातील गौरवपत्र प्रदान करण्यात येईल.
सदर कविता कु. संघराज संजय कदम, रूम नंबर. 303 अजय रेसिडेन्सी, साकेत कॉलनी, भूमी अभिलेख कार्यालयाजवळ पाग झरी रोड, चिपळूण, जि. रत्नागिरी या पत्त्यावर अथवा मोबाईल ९५११२७३३५५ या क्रमांकांवर PDF स्वरूपात किंवा sangharajk77@gmail.com वर दिनांक २६ जानेवारी २०२४ पूर्वी पाठवाव्या. या कविता लेखन स्पर्धेत प्रत्येक समाज घटकातील विशेषतः युवा कवी/कवयित्रीनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी कळवले आहे.
खेरशेत येथील ‘मातोश्री’ तर्फे स्मृतीशेष अशोक कदम स्मरणार्थ ‘एल्गार निळ्या पाखरांचा’ राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे आयोजन….
