रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सर्वांच्या एकत्रित विचारातून ठरवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये अडचण काही नाही. फक्त वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार जाहीर केल्यावर त्या उमेदवाराचा प्रचार करतील, असे प्रतिपादन भाजपा नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
जे. के. फाईल्स कंपनीसमोर भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या जागेमध्ये महायुतीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करण्याचे ठरवले. या कार्यालयाच्या भूमीपूजनावेळी मंत्री चव्हाण बोलत होते. याप्रसंगी श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज नलावडे, सुजाता साळवी, शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे, प्राजक्ता रुमडे, मंदार खंडकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, शैलेश बेर्डे, संकेत कदम, नंदू चव्हाण, राजन फाळके, सचिन वहाळकर, वर्षाराजे निंबाळकर, प्रियल जोशी, दादा ढेकणे, सुशांत पाटकर, मनोज पाटणकर, डॉ. शरद जोशी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, भाजपचा आज स्थापना दिवस आहे. देशभरात आज घरोघरी जाऊन भाजपा, एनडीएचा उमेदवार, विजयाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये एनडीचा उमेदवार विजयाच्या दृष्टीकोनातून महायुतीचे कार्यालय व्हावे, याकरिता भूमीपूजन करण्यात आले. कार्यकर्त्यांची बैठक झाली तेव्हा कार्यकर्त्याने सांगितले, माझी स्वतःची जागा आहे, येथे आपण कार्यालय करूया, आज वर्धापनदिन असल्याने भूमीपूजन केले.
खासदार श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी हॅट्ट्रिक करणार
खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भात मंत्री चव्हाण म्हणाले की, खासदार शिंदे विक्रमी मतांनी हॅट्ट्रीक करतील. महायुतीचे कार्यकर्ते दोन महिन्यांपासूनच कामाला लागले आहेत. आज नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. एका विकासकामाच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमात खासदार शिंदे व मी एकत्र होतो तेव्हा महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की कामाला लागा, आपले उमेदवार शिंदेच आहेत.