चिपळूण:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र व चिपळूण मधील सुप्रसिद्ध उद्योजग अमित गॅस एजन्सीचे सर्वसर्वा अविनाश अशोकराव शिंदे यांचे चिरंजीव समर्थ शिंदे यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ वयाच्या २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन २५५ वी रैंक प्राप्त केली आहे.
समर्थचे दहावी पर्यंतचे शिक्षण खेर्डी येथील मेरी माता शाळेत झाले असून नंतर त्यांनी रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. याचवेळी सन २०२२ पासून ‘यूपीएससी’च्या परीक्षेसाठी अभ्यास सुरु केला आणि हे घवघवीत यश प्राप्त केले. सदर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुणे येथील चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी (IAS) यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. समर्थ सध्या चाणक्य मंडळात प्रशिक्षक असून मुंबई येथील विधी कॉलेजमध्ये कायदा विषयाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मातोश्री शिक्षिका आहेत.
दसपटी विभागातून भारतीय प्रशासकीय सेवेत प्रथम आयएएस होण्याचा मान समर्थने प्राप्त केला आहे. त्यांनी सदर परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून दसपटी व कोकणातील तरुणांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला असून, त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र समर्थ शिंदे आयएएस. (IAS) परीक्षा उत्तीर्ण.
