➡️ साने गुरुजींच्या एकंदरीत जीवन चरित्रावर आधारित.

लेखन – हृषिकेश विश्वनाथ सावंत देसाई (९१४५६८०१०२)

           हळव्या मनाचा निर्भीड राष्ट्र भक्त! गांधीवादी विचाराने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे प. पू . साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांच्याबद्दल तर आपण सर्वांनी ऐकलेच असेल. ते शिक्षक असे होते की जणू असा महान शिक्षक त्यांच्यानंतर होऊच शकला नाही , आपल्या शिक्षकी पेशा ला राम राम ठोकल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत कॉँग्रेस मध्ये उडी घेतली व आपले जीवन गांधी विचाराने वेढून टाकले. आपले संपूर्ण आयुष्य नीतिमत्ता व हळव्या मनाने जगणारा हा नेता तुम्हाला कधी अमळनेर च्या मिल मजुरांच्या आंदोलनात दिसेल, कधी तुम्हाला पंढरपूर च्या विठ्ठालाच्या देवळात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषणाला बसलेला दिसेल. धर्म निरपेक्ष असलेले साने गुरुजी यांनी कधीच दोन धर्मात - दोन जातीत भेद केला नाही. आजही जेव्हा अमळनेर बाजारपेठेतील एका बोहरी मुस्लिम समाजातील त्यांच्या एका जवळपास १०० वर्षांच्या शिष्याला त्यांच्या बद्दल विचारले गेले असता तो हंबरडा फोडतो यातच साने गुरुजी यांचे जीवन हे किती समर्पित व प्रेमाने भरलेले होते हे आपल्याला समजते. अमळनेर वसतिगृहा चे अधीक्षक असताना आपल्या विद्यार्थ्यांना स्वत:ची मुलं मानणाऱ्या साने गुरुजी यांनी ना कधी आपल्या विद्यार्थ्यांचा अपमान केला, ना कधी साधा दम दिला, उलट वसतिगृहातील मुलांची अंतर वस्त्र धुण्यापासून ते त्यांचे बिछाने साफ करणे, पांघरूण-कपड्यांची घडी घालण्यापर्यंत काम त्यांनी केले आहे. वसतिगृहापासून शौचालय लांब असल्याने अनेक वेळेला मुलं वसतिगृहाच्या अंगणात शौच करून ठेवायचे, हे शौच स्वतः साफ करणारे साने गुरुजी, एका गरीब व आजारी मुलाचे खूप दिवस पत्र आले नाही म्हणून दूरवर स्थित असलेले त्याचे घर गाठून त्याची विचारपूस करणारे गुरुजी हे शिक्षकांसाठी तर आदर्श आहेतच परंतु संपूर्ण भारतीय समाजाचे देखील आदर्श आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक होणारे साने गुरुजी हे देशाचा विषय येताच आपले सर्वस्व झोकून देत असत. आपल्या हातून चुकून एक मुंगळा मारला गेला म्हणून शोक व्यक्त करणारे गुरुजी, स्वातंत्र्य चळवळीत कारागृहात अटकेत असताना अनेक कैदी साने गुरुजींच्या सान्निध्यात आले असता साने गुरुजींनी त्यांची विचारपूस केली असता असे समजले की त्या कैद्यांच्या घरी मुलं-पत्नी-कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न ओढवला आहे. हे समजताच डोळ्यातून अश्रू ढाळणाऱ्या गुरुजींनी त्याच क्षणी एक पेन व वही मागवून घेतली व ती संपूर्ण रात्र गांधीजींवर एक पुस्तक लिहून ते पुस्तक प्रकाशकाला विकून त्यातून येणार्‍या पैशातून त्या सर्व कैद्यांच्या कुटुंबियांच्या नावे पाकिटे बनवून पाठवणारे तसेच अनेक उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणारे साने गुरुजी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. आपल्या संपूर्ण जीवनात पैसा-संपत्तीला अजिबात महत्त्व न देणारे, सत्य, अहिंसा व कर्मावर ठाम विश्वास असणारे गुरुजी हे आताच्या समाजाचे आदर्श असले पाहिजेत. भले आजचे राजकारण, सामाजिक स्थिति व लोकांचे विचार बदलले असतील व एवढे टोकाचे चांगले वागणे आताच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत व वास्तव जीवनात शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा आदर्श जीवन कसे असावे याचे दाखले दिले जातील तेव्हा हळव्या मनाच्या या निर्भीड राष्ट्र भक्ताचा - प. पू. साने गुरुजींचा जयघोष प्रथम केला जाईल. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version