जेवणाचे पान वाढण्याची पद्धत.

आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येचे, प्रातःस्मरण, दंतधावन पासून निद्राराधनेपर्यंत उत्तम वर्णन केलेले आहे. निव्वळ जेवणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तरी एक ग्रंथ तयार होईल. स्वतःची तब्येत, स्वदेश, तेथील हवामान, ऋतुमान अशा अनेकविध घटकांवर आपली दिनचर्या, आहार-विहार आधारित आहे.
कितीदा खावे, काय खावे, कसे खावे, केव्हा खावे याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा घडलेल्या आहेत. कधी काय करावे आणि कधी काय करू नये याबद्दल तर नक्कीच झाला आहे.

जेवणाचे ताट कसे वाढावे या गोष्टीचा आपण फक्त असे विचार करूया. : भारतीय पद्धतीचे भोजन, विशेषतः मराठी पद्धतीचे भोजन म्हटलं कि पंगतच आठवते. म्हणजेच – खाली बसून जेवणे.
इंग्रजांनी बनविलेल्या शाळांनी केलेल्या (की न केलेल्या ?) संस्काराचा भाग म्हणून दुर्दैवानं पंगत म्हटलं तरी टेबले व खुर्च्यांवर बसलेली पंगत सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते. मग थोड्या विचाराने ते चित्र मागे ढकलून आपण खाली जमिनीवर, आसनावर मांडी घालून समोरील अन्नाचा आस्वाद घेणारी पंगत आठवावी लागते. एकदा का अशी पंगत आठवली कि मग आपसूकच केळीची पाने, त्यावर ठराविक क्रमाने, ठराविक ठिकाणी वाढले जाणारे पदार्थ, वाढेपर्यंत मोठयाने म्हटले जाणारे श्लोक आठवतात. हे अन्नासंबंधीचे श्लोक व त्यांची गरज याबद्दल वेगळा लेखा लिहावा लागेल.

या ठराविक क्रमाचे, जागेचे, प्रमाणाचे विशेष महत्व आहे. आधीच्या पिढ्या या बाबत आग्रही असायच्या. पण कालांतराने आधुनिकतेच्या नावाखाली आपली जीवनशैली बदलू लागली आणि त्याचबरोबर भोजनशैलीदेखील. प्रत्येक कृतीचा आपल्याकडे अत्यंत बारकाईने विचार केलेला आहे.

किती जेवावे ? : पोटाचे चार भाग केले तर २ भागात अन्न, १ भाग पाणी इतकंच जेवावे व एक भाग रिकामा ठेवावा असे सर्वसाधारण वर्णन आहे. पोटाला तड लागेपर्यंत खाऊ नये. जमिनीवर मांडी घालून बसलं पोटाचे प्रमाण किती वाढला आहे हे सहज कळून घेतो. साधा सोपा विचार; जास्त समजावून देण्याची गरज वाटत नाही. ताटात वाढताना काही पदार्थ जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला व काही उजव्या बाजूला तर काही ताटाच्या मधोमध वाढले जातात.
तोंडीलावणं (लोणची, चटण्या, कोशिंबिरी) हा भाग डावीकडे वाढला जातो. मुख्य पदार्थ उजवीकडे व मध्यावर असतो. पाणी डाव्या हाताशी असते.

लोणची चटण्या कोशिंबिरी ताटाच्या डाव्या बाजूला वाढल्या जातात कारण त्या भाजीपेक्षा कमी प्रमाणात खाल्ल्या जातात आणि जाव्यात. कारण साहजिक आहे लोणची टिकवण्यासाठी त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच त्या मिठाच्या संदर्भात असतात. आणि म्हणून डावीकडे वरच्या बाजूला वाढलेल्या मिठाच्या खाली एकाखाली एक पद्धतीने वाढल्या जातात. भाज्यांचे आहारातले प्रमाण जास्त असते त्यामुळे त्या खाणाऱ्याच्या उजव्याहाताशी वाढल्या जातात. भात पोळ्या हे सर्वात जास्त प्रमाणात सेविलें जात असल्याने ते मधोमध वाढतात.

आपलं जेवण नुसतं हातातोंडानी होत नाही तर पाच ज्ञानेंद्रियेही कार्यरत असतात. ताटातली ही डावी बाजू कमी प्रमाणात असूनही वास, रंग आणि चवीने पाचक याचं काम उत्तम करते. यासाठीच डावी बाजू सर्व प्रथम वाढली जाते. भूक वाढल्याने मनही संपूर्णपणे अन्नावर असतं. समोरील गोल ताटावर किंवा केळीच्या पानावर एक सरळ उभी रेष कल्पून ताटाचे डावे व उजवे भाग समजू. केळीच्या पानावर तर ती आधीच व्यवस्थितपणे दिसून येते.

डाव्या भागात सर्वांत वर काय वाढावे आणि त्या खालोखाल काय वाढावे याचा क्रम असा आहे ↴
लिंबू

दही

चटणी

कोशिंबीर

तळणीचे पदार्थ

गोड पदार्थ

पुरण – खीर

या क्रमाला सुद्धा काहीतरी संदर्भ देऊनच ते दिले गेले आहेत. साधे नसते वाटलेले पदार्थ सर्वात वर तर नुसते चिरून दह्यामध्ये किंवा ताकामध्ये घातलेले पदार्थ त्याखाली आणि नंतर अगदी संस्कार झालेले म्हणजे तळणी मधले तळलेले पदार्थ व त्याच्याखाली गोड पुरण आणि त्यासारखे पदार्थ अशी वाढण्याची रचना केली आहे.
वाढताना पान वाढणाऱ्यांनी सुद्धा पंगतीमध्ये आणताना पुढील क्रमानेच देव वाढायला आणावेत अशी आपल्याकडे पद्धत आहे.

१.दही → २.लिंबू → ३.चटणी/लोणचे → ४.कोशिंबीर → ५.तळणीचे पदार्थ → ६.गोड पदार्थ → ७.खीर पुरण

बरेचदा सुरुवात मिठापासून केली जाते. पण खरंतर मीठ सर्व पदार्थांत आवश्यक तितके घातलेलेच असते त्यामुळे अधिक घेऊ नये. पण आपण सवयीचे गुलाम. परंतु मिठापासून सुरुवात कधीही केली जात नाही. यानंतर उजव्या भागातला क्रम पाहू. उजव्या भागात सर्वांत वर काय वाढावे आणि त्या खालोखाल काय वाढावे याचा क्रम असा आहे.

कोरडी भाजी

रसभाजी / उसळ / पातळ भाजी

कढी / आमटी

कोणत्या क्रमाने हे पदार्थ वाढावेत याचा क्रम असा आहे.
८.कोरडी भाजी → ९.रसभाजी / उसळ / पातळ भाजी → १०.कढी / आमटी

आता ताटाच्या मध्यभागी काय वाढावे हे पदार्थ सुद्धा ठरवून दिले गेले आहेत. मध्यभागी वरच्या बाजूला मसाले भात – पोळी , त्या खालोखाल गोड भात / शिरा, त्याखाली नेहमीच पांढरा भात वाढावा.
:
मसाले भात – पोळी

गोड भात / शिरा

पांढरा भात

क्रम –
११.मसाले भात – पोळी → १२.गोड भात / शिरा → १३.पांढरा भात

क्रम समजण्यासाठी यात पदार्थाला नंबर दिले आहेत. त्या क्रमाने वाढावे.
हे झालं सुरुवातीला पान वाढण्यासंबंधी!

जेवायला सुरुवात केल्यानंतर कोणत्या क्रमाने परतवाढीसाठी पदार्थ न्यावेत हे सुद्धा संपूर्णपणे ठरलेलं असतं. भात सुरुवातीला कमी वाढला जातो व व्यक्तिपरत्वे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे सर्वात आधी भात वाढण्यास न्यावा. मागोमाग वरण आणि तूप न्यावे. मीठ वाढण्यास न्यावे. मीठ वाढण्याची ही योग्य अशी वेळ आहे. त्या नंतर आमटी किंवा कढी घेऊन जावी. तोपर्यंत जेवणास सुरुवात होऊन बहुतेक पदार्थाची चव घेतली गेलेली असते. मग भाजी वाढण्यास न्यावी. नंतर चटणी, कोशिंबीर व तळण. या दरम्यान पांढरा भात खाऊन झालेला असतो. अशा वेळी मसाले भात किंवा पोळी पुरी घेऊन जावी.

जेवण संपत आल्याचे दिसू लागताच पुन्हा एकदा पांढरा भात पंगतीमध्ये वाढण्याकरिता न्यावयाचा असतो. तो वाढून झाला की त्यानंतर दही वा ताक वाढावे.

भोजनान्ते पिबेत्‌ तक्रं, दिनांते च पिबेत्‌ पय:। निशांते पिबेत्‌ वारि: दोषो जायते कदाचन:।

याप्रमाणे कधी काय खाऊ आणि कधी काय पियावं हेही ठरलेलं आहे. परंतु आता कोणी हे शिकवतही नाही आणि कोणाला इच्छा हि दिसत नाही. कारण ते संस्कृतीच्या बाहेरच वाटू लागतं. किती हास्यास्पद परिस्थिती करूंन घेतली आहे आपण स्वतःच स्वतःची! आपल्या भोजनपद्धतीवर पाश्चिमात्य देशांचा अतिशय विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे उभ्यानी खाणे, बोलत गप्पा मारत जेवणे, चालत फिरत खाणे अशा गोष्टींमध्ये पोकळ मोठेपणा वाटतो आणि आपण आपली तब्येत गमावून बसतो. तर अशा आपल्या विचारपूर्वक, जाणीवपूर्वक आखल्या गेलेल्या पद्धतीला जुनी संस्कृती न समजता तिचा अवलंब करावा आणि स्वास्थ्यलाभ करून घ्यावा.

श्रीकृष्ण पंडित रत्नागिरी
८६६८३२९२०२

Exit mobile version