हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित “शिवस्मरण यात्रा” गडकोट मोहीमेचा प्रारंभ…

राजापूर :-  राजापूरातील शिवतिर्थावर सर्व शिलेदार एकत्रीत जमून, शिवभक्तांचे आराध्य, समस्त राजापूरकरांचे स्फूर्तिस्थान, छत्रपती शिवरायांना गडकोट मोहीम प्रमुख विवेक गुरव याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यानंतर प्रतिष्ठानचा छोटा शिलेदार निरंजन बावधनकर याने दमदार अशी गारद दिली, यावेळी मोहीमेला निघालेल्या सर्व शिलेदारांनी जोरदार घोषणा देत, शिवस्मारक दणाणून गेले. तीनही गाड्यांचे पूजन करुन, राजापूरातील प्रतिष्ठित व्यापारी उमेश कोळवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी राजापूर अर्बन बँंकेचे उपाध्यक्ष, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विवेक गादीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप गोखले, हिंदु जनजागृतीचे विनोद गादिकर, विश्व हिंदु परिषदेचे संदेश टिळेकर, शिवभक्त विनय गादिकर, संदीप देसाई इत्यादी अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. राजापूरचे नवनिर्वाचित आमदार किरण (भैया) सामंत यानी फोन करुन प्रतिष्ठानच्या या गडकोट मोहीमेची माहिती घेतली आणि गडकोट मोहीमेला व सर्व शिलेदारांना शुभेच्छा दिल्या आणि प्रतिष्ठानला आपूलकीने विशेष सहकार्य केले. यानंतर शिवछत्रपतींचा जयजयकार करत मोहीमेला सुरवात झाली. शनिवारी दि. १८ रोजी सकाळी गडदुर्ग पुरंदर येथे, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी सगळे शिलेदार नतमस्तक झाले. बालेकिल्ल्यावरील श्री केदारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले आणि तेथील जीर्ण झालेला जूना ध्वज बदलून नवीन भगवा ध्वज प्रतिष्ठानच्या शिलेदारांना फडकवला आणि हर हर महादेव च्या घोषणा दिल्या. नंतर पुरंदर गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी असलेल्या संग्रालयाला भेट देऊन माहीती घेतली व तेथील पवित्र सुवर्ण माती कलशात घेतली. यानंतर सायंकाळी लेण्याद्री यामुक्कामी भोजन करुन, विश्रांती घेण्यात आली. पहाटे लवकर उठून, तयार होऊन भजन करत, सर्वांनी जुन्नर येथील शिवजन्मस्थान गडदुर्ग शिवनेरीवर शौर्यगीते म्हणत, शिवरायांचा जयजयकार करत चढाई केली. यानंतर शिवनेरी गडदुर्गावरील पहिला महादरवाजा येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी सर्व राजापूरकर शिलेदारांच्या वतीने मंत्रघोषात गडदेवतेला आवाहन करत, गडपूजन करण्यात आले. यानंतर महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मेणा दरवाजा आणि कुलुप दरवाजा या शिवनेरीच्या सात दरवाजांना भेट देऊन तेथील इतिहासकालीन माहिती घेतली. या मध्ये गडाच्या भक्कम बांधकामांमुळे, मजबूत असे भक्कम संरक्षण ठिकाण बनलेले बुरूज बघितले, या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाची माहिती घेण्यासाठी इतिहास अभ्यासक अमर गायकवाड हा सुशिक्षित आणि प्रशिक्षित असा मार्गदर्शक (गाईड) केलेला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गडदुर्गाची माहिती घेतली, हा गड एका टेकडीवरती बांधलेला असून, जो नैसर्गिक खडक आणि मानवनिर्मित संरचना याचे संयोजन आहे. गड हा विविध विभागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये गडावरील चोर वाट, धान्य कोठार, बदामी तलाव, पाण्याचे साठे (गंगा / जमुना), टकमक टोक इत्यादी ठिकाणे पाहीली, यात सगळ्यात महत्वाचे गडावरील भवानीमाता, श्री शिवाई आईच्या मंदिराला भेट दिली. सात दरवाज्याच्या वाटेने गडावरती जाताना पाचवा शिवाई दरवाजा ओलांडून मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळल्यानंतर शिलेदार श्री शिवाई देवीच्या मंदिरात पोहचले. याठिकाणी देवी शिवाई तांदळा स्वरूपात आहे, या देवीला आई जीजाऊनी नवस केला होता, कि मला पुत्र झाला तर तुझे नाव मी माझ्या पुत्राला ठेवीन. आणि ज्या देवीच्या आशिर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांचा जन्म झाला, त्या देवी शिवाई मातेच्या चरणी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे शिलेदार नतमस्तक झाले. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने महिला सुहासिनी शिलेदारांच्या हस्ते, देवीची खणा नारळाची ओटी भरण्यात आली, यावेळी श्री देवीच्या चरणी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानला तुझा आशिर्वाद आणि कृपादृष्टी दे, प्रतिष्ठानच्या शिलेदारांना शिवकार्यासाठी / धर्मकार्यासाठी बळ दे, सामर्थ्य दे अशी प्रार्थना महेश मयेकर यांनी केली. या पवित्र व प्राचीन देवीच्या आवारात महिला शिलेदारांनी छोटासा हळदी कुंकु समारंभ साजरा केला. यानंतर सर्वांनी गडावरील शिवजन्मस्थानी भेट दिली, व शिवजन्माच्या स्थानी शिवबांच्या पाळण्याचे आणि सह्याद्रीच्या सिंहाच्या, रयतेच्या जाणत्या राजाच्या जन्मखोलीचे दर्शन घेतले. आणि याठिकाणीतील शिवचैतन्याची उर्जा असलेली त्याठिकाणची माती मस्तकी लावत, शिवबाचा पाळणा गीत आणि शिवरायांची शौर्य गीते गात छत्रपती शिवरायांच्या पावन आणि पुण्य भुमिला विनम्र अभिवादन केले, आशिर्वाद घेतले. व शिवजन्मस्थानावरील पवित्र सुवर्ण माती कलशात घेतली. याठिकाणी प्रतिष्ठानच्या शिलेदारांकडून गडावरती स्वच्छता मोहीम देखील घेण्यात आली, यामध्ये गडाच्या मार्गावरील कचरा गोळा करण्यात आला. छोट्या शिलेदारांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  यानंतर लेण्याद्रीच्या पायथ्याचे दर्शन घेतले आणि गडकोट मोहिमेची सांगत करण्यासाठी राजापूरकडे प्रस्थान केले. यावेळी यामोहीमेमध्ये ५ वर्षापासून लहान थोर, तरुण ६५ ते ७० पार केलेले जेष्ठ शिलेदार मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. प्रतिष्ठानच्या या मोहीमेचे नेतृत्व हे मोहीम प्रमुख विवेक गुरव यांनी केले. मोहीमेचे नियोजन आणि नियंत्रण मोहन घुमे, अभिजित नार्वेकर, मंदार बावधनकर, प्रसन्न देवस्थळी, निकेश पांचाळ, निखिल चव्हाण, संदीप मसुरकर दिलीप चव्हाण यांनी केले. गेली दहा वर्षे प्रतिष्ठान, गडकोट मोहिमांचे आयोजन करत आले आहे, परंतु यावेळच्या मोहीमेला शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला, या मध्ये प्रतिष्ठानच्या कार्यावरती विश्वास ठेवून, महिलांचा सहभाग अधिक होता. गडकोट मोहीमेला एस टी प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात या मोहीमेचे आयोजन करणे प्रतिष्ठानला शक्य झाले. यावेळी अनेक जणांनी या मोहीमेला स्वयंस्फुर्तीने मदतरुपी शुभेच्छा दिल्या. अनेक जेष्ठांनी आशिर्वाद दिला. पुढच्या मोहीमेला आवर्जून नक्की भेटू असं एकमेकांना आश्वासन देत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला, मोहिमेत सहभागी शिलेदारांनी आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले, जेष्ठ शिलेदारांनी मोहीमेत सांभाळून काळजी घेतल्याबद्दल प्रतिष्ठानला धन्यवाद दिले. जमेल तसे प्रतिष्ठानच्या कार्यात व इतर उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आणि मोहिमेची सांगता शिवतीर्थावर शिवरायांच्या चरणी करण्यात आली. शिवनेरी आणि पुरंदर या गडदुर्गावरील कलशातील पवित्र सुवर्ण माती हि फाल्गुन वद्य तृतिया या  तिथीनुसार शिवजयंती उत्सवावेळी सर्वांना मस्तकी लावण्यासाठी प्रतिष्ठान तर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जाहिरात..
Exit mobile version