रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात भाजपाचे असणार चार मंडल अध्यक्ष; भाजपाचे संघटन मजबुतीकडे लक्ष….

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने संघटन वाढवण्याच्या दृष्टिने तळकोकणात कंबर कसलेली दिसून येते. भारतीय जनता पार्टीचे महत्व तळ कोकणात वाढताना दिसत आले आहे. पूर्वी शिवसेना या पक्षाचे ग्रामीण भागात असलेले संघटन पाहता भाजपाला आपले संघटन वाढवण्याची संधी फारशी मिळाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपा तितकीशी मजबूत दिसली नाही. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये तळ कोकणात भाजपचे संघटन मजबूत होताना दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांनी देखील कोकणाकडे लक्ष केंद्रित केले आहे असे दिसते. खासदार नारायणराव राणे, रवींद्र चव्हाण, नितेश राणे यांनी संघटनात्मक बाजू मजबूत करण्याची दृष्टीने पावले उचलल्याचे दिसते.
             रत्नागिरी-सिंधुदुर्ग पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे कुटुंबातील वर्चस्व असल्यामुळे भाजपा तेथे लवकर वाढली. रत्नागिरी मध्ये मात्र तसे दिसले नाही. तरी देखील अलीकडच्या काळात भाजपाने रत्नागिरी मध्ये देखील संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. पूर्वी रत्नागिरी शहर, रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी उत्तर अशी तीन संघटनात्मक मंडल होती. भाजपाने यामध्ये पुनर्रचना करून विधानसभा क्षेत्रानुसार यामध्ये बदल करत रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी शहर यासह रत्नागिरी मध्य अशी संघटनात्मक मंडल रचना केल्याचे कळते.
           ग्रामीण भागामध्ये भाजपाचे संघटन वाढता दिसत आहे. तर शहरामध्ये देखील भाजपा मागील काही वर्षात चांगले काम करताना दिसली माळनाका पासून वरील प्रभागांमध्ये भाजपाचे काही नवीन चेहरे सक्रिय झाले असून त्यामुळे भाजपा शहरामध्ये देखील वाढताना दिसत आहे. मंडल अध्यक्ष निवडीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. रत्नागिरी शहर मंडलासाठी राजेंद्र फाळके यांच्यासह एकूण पाच जण इच्छुक असल्याचे कळते. रत्नागिरी दक्षिण साठी विद्यमान अध्यक्ष दादा दळी यांच्यासह तीन जण इच्छुक आहेत. रत्नागिरी मध्य नवीन मंडल तयार केले असून यामध्ये नाचणे, कुवारबाव, हातखंबा, निवळी आणि खाडीपट्टा या भागाचा समावेश असल्याचे कळते. या नवीन मंडलासाठी सर्वाधिक म्हणजे सात पदाधिकारी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी उत्तर मंडलासाठी विद्यमान विवेक सुर्वे यांच्यासह दोन इच्छुक आहेत.
              आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व आले आहे. मंडल निवडीमध्ये वरिष्ठ कोणाच्या गळ्यात मंडल अध्यक्षाची माळ घालणार. याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.     दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version