झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या कर्जतच्या भिमाद्री विद्यालयाचा १० वी चा निकाल १००%


कर्जत- दुर्गम भागातील शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या झेप प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना मोठे यश लाभले आहे.झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या कर्जत तालुक्यातील भिमाद्री विद्यालय या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून, संपूर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत शाळेच्या यशात भर घातली आहे.झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,संस्थेने या शाळेची दत्तक योजना स्वीकारल्यापासून केवळ शैक्षणिकच नव्हे तर भौतिक पातळीवरही मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. शाळेत मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित शौचालय,आधुनिक प्रयोगशाळा,सुसज्ज वर्ग, लायब्ररी,सौरऊर्जा पॅनल, सीसीटीव्ही प्रणाली,तसेच वह्या, पुस्तके,दफ्तर,पेन,गाईड व इतर शैक्षणिक साहित्य मुलांना मोफत पुरवण्यात आले.
    विशेष म्हणजे,सर्व मुलांना शाळेचा गणवेश दिला गेला असून मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स आणि अत्याधुनिक वेडिंग मशीन शाळेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळेच्या भिंतींना नव्या रंगरंगोटीने सजवले गेले असून ११ संगणक,प्रिंटर व इतर डिजिटल सुसज्जता शाळेला बहाल करण्यात आली आहे.या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि अभ्यासातही त्यांचा रस वाढला.
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व भौतिक वातावरण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर हा निकाल गाठला. केवळ निकालच नव्हे तर ही यशोगाथा झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.या पुढील टप्प्यात संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी,तसेच विविध क्षेत्रातील संधींबाबत माहिती देण्याची योजना आखण्यात आली आहे.झेप प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उज्वल भवितव्याची दारे खुली झाली आहेत.शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी झेप प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. “शिक्षण हीच खरी शक्ती आहे” हे ध्येय बाळगून झेप प्रतिष्ठान ज्या प्रकारे दुर्गम भागात कार्यरत आहे, ते निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Exit mobile version