जितेंद्र आव्हाड यांचे इतिहास संशोधनात योगदान काय? – योगेश मुळे

संगमेश्वर: आज ठाणे येथील विवियाना मॉल येथील सिनेमागृहात आक्रस्ताळेपणा करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत शिरीष देशपांडे दिग्दर्शित आणि सुबोध भावे, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी करत मराठी प्रेक्षकांना मारहाण केली. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात लोकांमधून निवडून येऊन काही काळ मंत्रीपद भोगलेल्या या व्यक्तीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध नोंदवतो आणि अशा गुंडागर्दीस प्रोत्साहन देणार्‍या आमदारांवर शासनाने कायद्याचा बडगा उगारावा अशी राज्याचे गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संगमेश्वर भाजपाचे सोशल मीडिया संयोजक योगेश मुळे यांनी दिली आहे. मुळात चित्रपटातील कोणत्याही गोष्टींचा निषेध नोंदवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे जाब मागता येऊ शकला असता. मात्र आव्हाड मदांध असल्याने कोणत्याही स्वरूपाचा विधिनिषेध न बाळगता केवळ 'मी सांगतो तोच खरा इतिहास' या आविर्भावात वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत होते. यासाठी आव्हाडांनी 'इतिहास संशोधनातील माझे योगदान' या विषयावर आत्मचिंतन करावे. ओघात बोलताना आपण नेमके काय बोलतो आहोत याचे भानही त्यांना नसल्याचे दिसून आले. सभासदांची बखर असते तिथे त्यांनी सभासदांची शकावली असा शब्दप्रयोग केला. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात केवळ ३ मिनिटे भेट झाली आणि खेळ संपला असे विधान केले. अतिशय ठामपणे सांगितले की कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांच्या कपाळावर नेमक्या कोणत्या ठिकाणी तलवारीने वार केला. शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे मुंडके उडवले की पोटात तलवार खुपसली हे देखील त्यांना माहीत होते. बर एवढे करून शिवाजी महाराज गडाखाली उतरले असे ते गडबडीत बोलून गेले. मुळात इतिहास असे सांगतो की शिवाजी महाराज कार्यभाग आटोपल्यानंतर गडावर पुन्हा गेले. म्हणजे खोटेसुद्धा एवढ्या ठामपणे सांगत होते की जणू ही घटना घडली त्यावेळी ते महाराजांच्या बाजूलाच उभे होते. कृष्णाजी नाईक-बांदलास मारल्यावर बांदल जिजाऊ माँसाहेबांच्या परगण्यातील मांडलिक झाले खरे. मात्र शिवाजी महाराज त्यांच्या डोळ्यात सलत होते ही वस्तुस्थिती समकालीन पुरावे आहेत. यासाठी बांदलांचे तत्कालीन लेखन वाचावे. मात्र शिवरायांनी मोठ्या शिताफीने बांदल सेनेला आणि बाजीप्रभू देशपांडे यांना आपल्याकडे वळवून घेतले हा इतिहास आहे. चित्रपटातील अन्य तपशील सत्यासत्यतेच्या कसोटीवर अभ्यासकांनी जरूर पडताळून पहावा. पण विरोध करण्यासाठी हिंसक मार्ग वापरणे केव्हाही निंदनीयच. केवळ महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या इतिहासाचार्यांचा विरोध करायचा म्हणुन बेताल वक्तव्ये करणारे आव्हाड हे आता महाराष्ट्रातले दुसरे बाजारू इतिहासकार म्हणुन नक्कीच प्रसिद्धीस येणार यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे मनसे चित्रपट आघाडी प्रमुख अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे त्यास मी पूर्ण समर्थन देतो. असे योगेश मुळे म्हणाले. जितेंद्र आव्हाड या गोष्टी शिवरायांच्या प्रेमाखातर करत असतील, शिवभक्त म्हणून करत असतील तर त्यांनी त्यापूर्वी शिवरायांची तत्त्वे अंगीकारावीत. जनतेला त्रास होईल असे वर्तन शिवरायांना कदापि अभिप्रेत नव्हते. आव्हाड साहेब शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुण्या एकाचा नसतो; तो एकाच वेळी संपूर्ण रयतेचा असतो. त्यामुळे केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करून चालू केलेला हा बाजार त्वरित थांबवा व शाश्वत विकासाकडे आणि रयतेच्या कल्याणाकडे लक्ष द्या हाच खरा महाराजांवरील श्रद्धा प्रदर्शित करण्याचा योग्य मार्ग आहे. असा खोचक टोलाही यावेळी मुळे यांनी लगावला.

Exit mobile version