रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढवण्यात येईल, असे भाजपा लोकसभा प्रवास योजना भाग २ चे महाराष्ट्राचे संयोजक तथा माजी मंत्री संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाराष्ट्रात १८ मतदारसंघात भाजपाने जोर लावला असून गेल्या वेळीपेक्षा जास्त जागा जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री. भेगडे आज सायंकाळी रत्नागिरीत आले असता त्यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी उपस्थित होते. श्री. भेगडे म्हणाले की, जिल्ह्यात लवकरच केंद्रीय मंत्र्यांचा दौरा होणार आहे. भाजपा संघटन मजबूत करण्यावर सध्या भर आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. महाराष्ट्रात ४८ ठिकाणी भाजपाचे उमेदवार व शिंदे गटाचे उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवतील. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम चालू झाले आहे. तत्पूर्वी संघटना मजबूत होणे आवश्यक आहे. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली आहे. त्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. या निवडणुका भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्णसंधी आहे. शिंदे गटासोबत युती करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच घेतला जाणार आहे. याबाबत वरिष्ठ योग्य त्या सूचना करणार असल्याचे भेगडे यांनी स्पष्ट केले.
श्री. भेगडे म्हणाले की, “भाजपने राज्य व केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून सेवा दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा आढावा घेणे, नागरिकांशी संवाद साधणे व भाजपाची संघटना मजबूत करणे या उद्देशाने लोकसभा प्रवास योजनेत देशभरातील १६० लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असून भाजप कार्यकर्ते, जनता यांच्याशी संवाद साधणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. केंद्रीय मंत्री तसेच राज्य व केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक भागात विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना याचा योग्य पध्दतीने लाभ मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवरही प्रयत्न होत असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजनेची ही यात्रा राज्यात सुरू असून भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री यांच्या सभा राज्यभर होणार आहेत. त्यांचे नियोजन करणे व कार्यक्रम ठरविणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे श्री. भेगडे यांनी स्पष्ट केले.
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्र.*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक भाजपा लढणार- बाळासाहेब भेगडे.
