राहुल गांधी यांना चांगल्या डॉक्टरची गरज : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्वातंत्रवीर सावरकर यांना स्थानबद्ध करण्यात आलेल्या रत्नागिरी येथील कारागृहातील कोठडीला व सावरकरांनी अस्पृश्य प्रत्येक बांधवांना देवाची पूजा आणि मूर्तीला स्पर्श करण्यासाठी बांधलेल्या पतित पावन मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी येथे येऊन कधी बघितले का, असा सवाल करीत मा. बावनकुळे यांनी राहुल गांधी यांची स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का, असाही टोला लगावला.

आज बाळासाहेब ठाकरे असते तर राहुल गांधी यांना राज्यातून हाकलून लावले असते, परंतु त्यांचे नातू गळाभेट घेत आहेत. राहुल गांधी यांनी ही कोठडी बघावी, साखळदंड, बेड्या बघाव्या. सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके बघावी. आज मी हे सारे बघितले, भावना अनावर झाल्या. या भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी राहुल गांधी यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमकर, तालुकाध्यक्ष मून्ना चवंडे, तालूका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर उपस्थित होते.

Exit mobile version