देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात "पोलीस शहीद दिनानिमित्त"
शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतीस प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी पोलीस दलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्याचे काम पोलीस दलाकडून नियमितपणे केले जाते. वाहतूक तसेच विविध प्रसंगी होणारी गर्दी यावर नियंत्रण व शिस्त राखण्याचे काम पोलीस दल उत्तम प्रकारे करत असल्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षितता व सलोखा उत्तम प्रकारे राखण्यास मदत होते. महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल तसेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असून, आपापली सेवा उत्तम प्रकारे करीत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध पोलीस दलामध्ये सेवा करण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये विचार करावा असे आग्रही मत प्राचार्य सरांनी व्यक्त केले. महाविद्यालयात "पोलीस शहीद दिना" निमित्त देवरुख पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांचा संस्था व महाविद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून पोलीस शहीद दिन साजरा करण्यामागील औचित्य, त्याचप्रमाणे पोलीस दल हे देशांतर्गत शांततेसाठी कसे महत्त्वाचे आहे. याबाबत विविध उदाहरणांनी सविस्तर माहिती दिली. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी देवरुख पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, विजय मावळणकर, मेधा बोंद्रे, माया गायकवाड, पायल भिसे यांना सन्मानित केले. युयुत्सू आर्ते यांनी पोलीस दलाबद्दल आदर व्यक्त करून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या मनोगतात, दिवाळीला फटाके न वाजवता फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी, तसेच समाजात जाऊन फटाक्यांसाठी खर्च केली जाणारी रक्कम सर्वांनी जमा करण्या विषयी आवाहन उपस्थितांना केले. ही जमा झालेली रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देवरूख पोलीस ठाणे यांच्याकडे जमा करण्याबाबत आग्रही मत व्यक्त केले. आपला समाज गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी घरोघरी आज शिवाजी जन्म घेण्याची गरज संस्थाध्यक्ष भागवत यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा फाटक यांनी, तर आभार प्रा. विकास शृंगारे यांनी मानले.
फोटो- पोलीस कर्मचारी सन्मान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष भागवत, उपप्राचार्य डॉ. पाटील, आर्ते, पो. नि. जाधव, मावळणकर.