स्वरगंधच्या साथीने स्वराज्य प्रतिष्ठानने वृद्धाश्रमात केली दिवाळी

रत्नागिरी ( प्रतिनिधी दि. 23) कोरोनानंतर प्रत्येकजण धडाक्यात दिवाळी सण साजरा करीत असताना स्वराज्य प्रतिष्ठान लांजाने संगीत स्वरगंधच्या कलाकाराना साथीला घेत तालुक्यातील पावस येथील अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमात दीपावली स्वरसंध्या साजरी करीत वृद्ध, निराधार माताना दीपावलीची सुखद भेट दिली. कै. दाजी पत्याणे यांच्या आशिर्वादाने स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ पत्याणे यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी हा उपक्रम यशस्वी केला. त्यास संगीत स्वरगंधचे यासिन नेवरेकर आणि कलाकारानी मोलाची साथ दिली. यावेळी व्यासपीठावर दैनिक सकाळचे व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदर्श शिक्षक सुहास वाडेकर,कृषी अधिकारी विजय पोकळे, ऍड. सावंत, जेष्ठ गायक यासिन हमीद, शिक्षक सुनिल गोसावी, पोलीस कर्मचारी आदि उपस्थित होते.

1जानेवारी 2012 रोजी स्थापन झालेल्या प्रतिष्ठानच्या कामाचा आढावा प्रास्ताविकात सुहास वाडेकर यांनी घेतला. सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने झटणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागात केलेल्या उत्तुंग कार्यामुळे अल्प कालावधीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना कालावधीत बजावलेली कामगिरीही विषद करीत त्यांनी दीपावली संध्या वृद्धाश्रमात आयोजित केल्याबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ पत्याणे यांना विशेष धन्यवाद दिले. प्रमुख मार्गदर्शन करताना स्वराज्य प्रतिष्ठान कोणताही दिखाऊपणा अथवा दांभिकता न आणता निस्वार्थीपणे काम करीत असल्यानेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती जोडल्या जाऊन दशकभर अविरत वाटचाल सुरू असल्याचे मत सकाळचे व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दरम्यान त्यांच्या हस्ते अभिनेत्री पूजा सावंत, गनी भाई, रत्नागिरी कलाकार ग्रुप संस्थापक जेष्ठ गायक राकेश मोरे दाम्पत्य, कृषी अधिकारी विजय पोकळे, उर्मिला करगुटकर, नरेश पांचाळ,कस्तुरी डान्सर,स्नेहा शिवलकर, सौरभ खानविलकर चा विशेष सन्मान करण्यात आला. नाट्य परिषद अध्यक्ष जोशी यांनी दीप प्रज्वलित करून अनुसया आनंदी वृद्धाश्रम परिसर उजळला. स्वरगंध गायक कलाकार राकेश मोरे,मोरे वहिनी, सर्वथा चव्हाण, विनय नागवेकर, नरेश पांचाळ, मंजुषा जोशी, सुनिल गोसावी, वैभव तळेकर यांनी विविध गीते सादर करीत उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. शेवटी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्रमातील माताना ब्लॅंकेट, मिठाई, उटणे आदि साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचा आस्वाद घेताना परिसरात फुललेले चैतन्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमच्या खातू, कदम, कर्मचारीवर्ग , स्वराज्य प्रतिष्ठान आणि संगीत स्वरगंध परिवार यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version