रत्नागिरी : स्पर्धा परीक्षा या ८० टक्के वर्तमानपत्रातील बातम्यांवरच आधारीत असतात. म्हणून आपण दररोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बातम्या आपण वाचताना आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. आपण आतापासूनच वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाल तेव्हा तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल असा सल्ला रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिला. ते द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने आज पत्रकार दिनी आयोजित ‘बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने’ या व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसचे जमीर खलपे यांना पत्रकार भूषण आणि फ्रेश न्यूजचे सिध्देश मराठे यांना पत्रकार सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या सभागृहात द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव. अ. के. देसाई हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक विनोद गावखडकर, द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरीचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे, तालुका अध्यक्ष सिध्देश मराठे, तालुका सचिव पुर्वा किणे, खजिनदार निलेश आखाडे, सामाजिक कार्यकर्ते अजिज मुल्ला, अ. के. देसाई हायस्कूलचे कलाशिक्षक जयसिंग लोहार व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेसचे जमीर खलपे यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेबरोबरच संपर्क युनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून जमीर खलपे यांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर ते रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्यदूत म्हणून काम करतात. त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. दैनिक फ्रेश न्युजचे सिध्देश मराठे यांना पत्रकार सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सिध्देश मराठे त्यांनी पत्रकारितेत अल्पावधीत आपला ठसा उमटवला असून ते राजापूरातील शिवणे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत. राजापूर आणि रत्नागिरीतील अनेक सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान आहे. त्यांच्याही कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन दोन्ही सत्कारमुर्तीना गौरवण्यात आले.

वर्तमानपत्रं ही आरसा आहेत ‘बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते तहसीलदार शशिकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वर्तमानपत्र वाचणे ही काळाची गरज आहे. आजचा व्याख्यानमालेचा विषयही चांगला ठेवला आहे. तुम्हाला जर शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली तर पुढे महाविद्यालयीन जीवनात तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळू शकता. आज दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कोकण अव्वल असतो. स्पर्धा परीक्षेत मात्र कोकणचे अस्तित्व अल्प आहे. याचे कारण स्पर्धा परीक्षांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती नाही. ही जागृती निर्माण करण्याची गरज आहे. हे काम अशा व्याख्यानमालांमधून होऊ शकते. स्पर्धा परीक्षांचा ८० टक्के पेपर हा वर्तमानपत्रातील बातम्यांवर आधारीत असतो. तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचलात तर तुम्हाला आजूबाजूला काय घडते? राज्यात, देशात आणि विदेशात काय घडते? याची माहिती मिळेल. वर्तमानपत्रातील क्रिडापानाबरोबरच पहिले पानही वाचणे महत्वाचे असते. कारण त्या पानावर महत्वाच्या बातम्या असतात. बातम्या वाचून आपल्या सामान्य ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते. आज कोल्हापूर किंवा इतर जिल्ह्यातील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेला बसण्यामध्येच स्पर्धा आहे. तशीच स्पर्धा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहीजे. म्हणून तुम्ही उद्यापासून वर्तमानपत्र वाचण्यास सुरवात करा. वर्तमानपत्र हा आरसा आहे. तो आपल्याला सर्व जग दाखवत असतो. असे उदगार तहसीलदार जाधव यांनी काढले. कार्यक्रमाची प्रस्तावना दुर्गेश आखाडे यांनी तर सूत्रसंचालन निलेश आखाडे यांनी केले. फोटो कॅप्शन:
• द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरीच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलपे यांना प्रदान करताना.
• द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरीच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना प्रदान करताना.