महाराष्ट्रात थंडीची चाहूल..कोकणात येण्यास पर्यटकांची गर्दी..

रत्नागिरी : पावसाचा मुक्काम अधिक लांबल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवली नाही. त्यामुळे आता थेट थंडीचे आगमन झाले असून राज्यातील सर्वच विभागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. वातावरणामध्ये काहीसा गारटा जाणवू लागला आहे. पर्यटक देखील थंडीचा अनुभव घेण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ३.२ अंशाने कमी आहे.


परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. आता तापमानात घट होत आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. काल मुंबईत २३.४ तर रत्नागिरीत १९.२, तापमानाची नोंद झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे.
थंडीच्या कालावधीत कोकणात येणारे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात यावेळी कोकणातही उष्णता कमी असल्याने हा कालावधी पर्यटकांसाठी कोकणात पर्वणीच असते. कोकणात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येताना दिसत असून गणपतीपुळे, पावस, अडीवरे यांसारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version