दोन दगडांच्या पाळू मध्ये कडधान्य टाकून , त्यावर वेदनेच्या आणि दुःखाच्या ओव्या गात संसाराचं जातं फिरवणारी ती. कधी ती इतिहासाच्या पानावरची जिजाऊ ,सावित्री, अहिल्या आणि रमाई म्हणून पाहायला मिळाली. तर कधी कुटुंब व्यवस्थापनेतील बहिण ,पत्नी आणि आई म्हणून पाहायला मिळाली. कधी ती आदर्शवत लोकसेवक म्हणून पाहायला मिळाली , तर आजच्या काळातील अग्रेसर डॉक्टर ,इंजिनियर आणि वकील म्हणून पाहायला मिळाली. तरीसुद्धा देवळात देवी म्हणून, शाळेत सरस्वती म्हणून, आणि घरात लक्ष्मी म्हणून पुजली जाणारी ती, अन्याय ,अत्याचार, बलात्कार ,रुढीपरंपरा ,ऍसिड हल्ले यांसारख्या दृष्ट्चक्रात अडकून पिढ्यान पिढ्या ते आजतागायत नामक बंधन नावाच्या लॉकडाऊन मध्ये अडकली गेली ती सुद्धा तीच. आणि हाच तिचा नाहक बंधनात्मक प्रवास आपल्यासमोर मांडून ति च्या अनलॉकसाठीचा हा एक छोटासा प्रयत्न.
लॉकडाऊन…सर्वांच्या जीवनाला अगदी काही महिन्यात कलाटणी देणारी एक भयंकर घटना. पण निसर्गामुळे घडून आलेली ही नैसर्गिक घटना म्हणावी , की एवढी वर्ष ती च्या आयुष्यातल्या त्या लॉकडाऊनचे अनुभूती जगाला करून देण्यासाठी, देव आणि निसर्ग यांची एक आगळी चाल म्हणावी यापुढे भलं मोठ प्रश्नचिन्ह..
मित्रहो, ती आणि तिचा आतापर्यंतचा खडतर प्रवास आठवला की अंगावरती शहारे येतात. नाहक आणि निरर्थक पुरुषी मतांची चिड येते. तर दुसऱ्या बाजूला त्यातीलच काही ती चा, आणि ति च्या आयुष्यातील लॉकडाऊन उठवण्या साठीचा आणि ति च्या हक्कांसाठीचा संघर्ष आठवला की अभिमान देखील तितकाच वाटतो.
कारण कधीकाळी शिक्षणासाठी सुद्धा वंचित ठेवलेल्या ति ला चूल आणि मूल, रूढी परंपरा यांच्या नावाखाली मानवी जातीला लाजवणाऱ्या अशा लॉकडाउन मध्ये अडकवण्यात आलं. पण याच विरोधात जिजाऊ, सावित्री यांचे संघर्ष हे आज इतिहास घडवणारे ठरतात.

पण आता युग लोटलीत .काळ बदलला. आणि आदर्शांच्या संघर्षांना यश मिळालं खरं. काळाआड कितपत पडलेल तिच लॉकडाऊन उठवलं नक्कीच गेलं. पण फक्त सामाजिक रित्या. कारण जुन्या लॉकडाऊन मधून मुक्त होत असताना, कौटुंबिक बंधनाच्या बेड्या मात्र तिच्या पायात अडकवल्या गेल्याच. सामाजिक लॉकडाऊन उठलं असलं तरी, ती घराबाहेर गेली ,कमवू लागली , की ती हाताबाहेर गेली. तिने याच वेळेत जायचं, याच वेळेत यायचं, इतकंच आणि हेच शिकावं, आपण सांगू तेव्हा आणि सांगू तिथे नांदायला तयार असावं असं एक नवं आणि भयंकर चार भिंतीतला चार चौकटीतलं लॉकडाऊन तिच्या नशिबात आलं.
कालांतरांन मानवी विचारसरणी शिक्षित झाली . तशीच प्रगत सुद्धा झाली. बंधनातली ती घराबाहेर पडून शिकू लागली .मुक्त वावर करू लागली. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्याहूनही वरचढ झाली. कधीकाळी तिच लॉकडाऊन पोटातच संपवलं जायचं. त्याच तिला समाजात आणि घरात सुद्धा एक मोठं स्थान मिळू लागलं. आणि खुंटली जाणारी कळी, घराची ज्योती झाली.
पण तरीही ती, ही शेवटी ती आहे त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा, तिच्याशी वागण्याचा, आणि तिला वागवण्याचा नीच दृष्टिकोन हा अनेकांचा बदलला नाहीच.
समाज प्रगत झाला ,जग विज्ञानवादी बनलं तरी आज कोणत्याही वाईट गोष्टीला तिलाच जबाबदार ठरवलं जातं. आज विज्ञान खूप पुढे गेलं असलं, तरी एखादा दांपत्याला मूल होत नसेल तर विचार न करता थेट तिलाच दोषी ठरवलं जातं.
समाजाच्या जातपातीच्या भांडणात अगदी मुलांना सूट दिली जाते. पण फक्त ति च्या प्रेमाचा मारून खून केला जातो. घरातून प्रेमाला विरोध झाल्यावर बापाची साथ सोडली तर तोंड काळ करणारी, खानदानाला काळीमा फासणारी . आणि प्रियकराची साथ सोडली तर ‘सो कॉल्ड बेवफा आणि धोकेबाज’ . थोडक्यात काय, तर बाप किंवा प्रियकर कोणाचीही साथ दिली तरी दुसऱ्या बाजूने गुन्हा तिचाच सिद्ध केला जातो. आज हे ना असे अनेक कौटुंबिक आणि सामाजिक अपराध फक्त तिच्याच नावे केलेले दिसून येतात.
मित्रहो, ति चा सामाजिक आणि कौटुंबिक लॉकडाऊन जरी संपला असला तरी संघर्ष कायमच ठरताना दिसून येतो . ज्यावेळेस देशातील निर्भया आणि डॉक्टर प्रियंका रेड्डीज सारख्या त्या आमच्या समोर आल्या त्यावेळेस कळून आलं की, अजूनही ती चा लॉकडाऊन संपलेलं नाहीच. याउलट समाजकंटकांच्या भीतीचा पुन्हा एक नवं आणि भयंकर लॉकडाऊन तिच्या आयुष्यात आलं. आणि ते अजूनही कायम आहे. मित्रहो , विषयाचा अभ्यास करत असताना असं मला प्रकर्षाने जाणवलं की आपल्या विचारात प्रगती नक्कीच झाली. ती च्या लॉकडाऊन संघर्षाचे तीव्रता आपल्याला कळाली. पण आपल्याला फक्त ती कळालीच. पण आम्ही तिच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले नाहीतच. कोणी केले तरी त्यांना आपली साथ नाही. म्हणूनच कुठेतरी ती , कालांतरापासून ते आजतागायत, नवनवीन बंधनात बंदिस्त झालेली दिसून येते.
अशा अनेक ती चा विचार बाजूला ठेवला आणि स्वतःच्या घरातील त्या तिचा आपल्या आईचा विचार केला. तरी सहज कळून येतं की कधी नवऱ्याच्या, कधी मुलांच्या, कधी कुटुंबाच्या ,कधी परंपरांच्या, तर कधी सो कॉल्ड मर्यादांच्या लॉकडाऊन मध्ये ती बंदिस्त आहे.
दीड वर्ष सहन केलेला लॉकडाऊन आपल्याला नकोसा झाला, जीवघेणा झाला. पण मग इतक्या वर्षांच्या त्या ती च्या लॉकडाऊन च काय?
देशात झालेलं लॉकडाऊन संपलं.
पण तीच लॉकडाऊन कधी संपणार हा समाजासमोर असलेला एक मोठा प्रश्न ⁉️