भाजपच्या दणक्याने रस्त्याचे काम तातडीने होणार सुरु..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता भारतीय जनता पार्टीने या विषयावर आवाज उठवला आहे. विशेष करून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून परिसरातील लोकांना वाहने चालवण्यास प्रचंड नाहक त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांना देखील याचा त्रास होत असून जनभावना लक्षात घेता रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 आठवडा बाजार प्रमोद महाजन क्रीडांगण ते वैभव हॉटेल पर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे नागरिकांची नाराजी पाहता संबंधित रोड करणारे कॉन्ट्रॅक्टर यांना ब्लॅक लिस्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांचे बिल देण्यात येऊ नये; अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसामान्य जनतेच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी नवीन रस्ता करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टी आक्रमक भूमिका घेईल असे खडसावून सांगण्यात आले होते.
काल 20 ऑक्टोबर रोजी देखील भाजपा कार्यकर्ते यांनी रत्नागिरी नगर परिषद येथे ठिय्या मांडला होता व आपली भूमिका आक्रमकतेने मांडली. रत्नागिरी मुख्यधिकारी यांची भेट न झाल्याने कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. सदरील रस्ता करणारे कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत समावेश करा अशी मागणी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीने गेली अनेक महिने याबाबत रत्नागिरी नगर परिषदेशी पत्रव्यवहार करूनही याबाबत दात घेतली गेली नाही. रत्नागिरी नगरपरिषदेने देखील या ठेकेदाराला तब्बल दोन ते तीन वेळा सदरील कामाबाबत नोटीस बजावून देखील हा ठेकेदार येत नसल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे इंजिनियर यांनी सांगितले. हा ठेकेदार नगरपरिषदेच्या पत्रांना देखील जुमानत नसेल तर याला काळ्या यादीत का टाकले जात नाही? असा सवाल भाजप पदाधिकारी यांनी नगरपरिषदेला केला. मात्र या ठेकेदाराच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती असल्याचा सूर ऐकू आला. आणि या अदृश्य शक्तीमुळेच या ठेकेदाराला अभय दिले जात आहे असे बोलले जात होते.
आज दिनांक 21 रोजी पुन्हा सर्व भाजप कार्यकर्ते यांनी आपली भूमिका कायम ठेवत नगर परिषद येथे गर्दी करत आपली भूमिका मांडली. शहरातील मुख्य रस्ता आठवडा बाजार ते काँग्रेस भुवन याची झालेली दुरवस्था आणि त्याला जबाबदार असलेला ठेकेदार जाहिद खान याच्यावर लायसन्स रद्दबाद करण्याची मागणी आक्रमक पणे कायम ठेवत नगरपालिका प्रशासनासमोर मांडली.
दोन दिवस ठेकेदारांला काळ्या यादीत टाकण्याच्या पत्रावर आज कोणाच्या तरी अदृश्य दबावाखाली येऊन मुख्याधिकारी यांनी निलंबनाच्या पत्रावर सही न करता नगर परिषद कार्यालयात न येण्यात समाधान मानले काल भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा उद्रेक पाहून उद्या 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निलंबनाच्या पत्रावर सही करतो असे फोनवर कबूल केले होते. मात्र तसे झाले नाही सदर मागणीनुसार निलंबनाच्या पत्रावर अन्य कोणाच्या दबावामुळे सही न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनात त्याचं रस्त्यावरील माती टाकण्यासाठी सर्व कार्यकर्ते यांनी तयारी दर्शवली व आक्रमक भूमिका घेतली. मात्र आज भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी मुख्याधिकारी यांना केलेल्या फोन नंतर रत्नागिरी नगर परिषदेने पावसाचा अंदाज घेत आजच्या आज या रस्त्याचे काम सुरू करू व तसे पत्र देण्याचे मान्य केले. व तसे पत्र देण्यात आले असल्याचे कळते. भारतीय जनता पार्टीच्या या तीन दिवस चाललेल्या आक्रमक भूमिका मुळे रत्नागिरी नगर परिषदेला या रस्त्याची तातडीने दखल घ्यावी लागली आणि या रस्त्याकडे गांभीर्याने पाहत या रस्त्याचे काम करावे लागणार आहे.
यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, महिलामोर्चा, युवामोर्चा भाजपा नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे आणि शहराध्यक्ष सचिन करमरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संदीप सुर्वे, विक्रम जैन, सोनाली आंबेरकर, निलेश आखाडे, सचिन गांधी, पमु पाटील, राजीव कीर, प्रवीण देसाई, विश्वनाथ केळकर, दादा ढेकणे, नितीन जाधव, वर्षा ढेकणे, उमेश कुलकर्णी, संदीप रसाळ, राजन फाळके, राजन पटवर्धन, आदी उपस्थित होते.
