बातम्या

मुंबई उपनगरीय मनपा रुग्णालयातील मनुष्यबळ पुरवठा कंत्राटी कामगारांच्या वेतनात ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी KHFM आणि अधिकाऱ्यांच्या चौकशी ची मागणी…

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमून सुरू असलेल्या मनमानी आणि अनागोंदी कारभाराचे एक परकरण समोर आले असून मुंबई मनपा उपनगरीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप RTI कार्यकर्ते आणि दलित युथ पँथर चे मुंबई सचिव – पँथर आदित्य मैराळे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई मनपा मध्यवर्ती खरेदी खाते तर्फे १३ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधी करिता KHFM या कंपनीला मुंबई उपनगरातील ईस्ट आणि वेस्ट झोन मधील १०(दहा) रुग्णालयात हाऊस कीपींग कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवठा कामाचे कंत्राट दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि दलित युथ पँथर चे मुंबई सचिव आदित्य मैराळे यांनी या कंत्राटी कामगारांशी चर्चा केली असता अशी माहिती मिळाली की , कामगारांना किमान वेतन कायदा नुसार मुळवेतन आणि विशेष महागाई भत्ता , घरभाडे जोडून आणि भविष्य उदरनिर्वाह निधी जे वेतन मिळायला पाहिजे त्यात आणि दरमहा कामगारांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा होणाऱ्या वेतनात १०,०००/- रुपये इतका फरक आहे.

सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा त्यात कंत्राटी कामगारांचे शोषण होवू नये म्हणून उद्योग , ऊर्जा आणि कामगार विभागाने परिपत्रक काढले असून, त्याचे पालन करणं मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिल्याच्या कंत्राटदाराच्या बँक विवरणाच्या प्रती , कर्मचारी हजेरी नोंदवही च्या प्रती,pf,esic ,केलेल्या शासकीय भरणांच्या पावत्या तपासणी केल्या शिवाय बिले प्रमाणित करून पारित केली जाऊ नयेत असे शासन आदेश आहेत.कंत्राटदाराने कामगारांना कमी वेतन दिल्यास किंवा न दिल्यास ते देणे मुख्य नियोक्ता या नात्याने मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.त्यानुसार कंत्राटी कामगार कायदा १९७० कलम २१(४) नुसार ३ कोटी रुपयांची फरकाची रक्कम मुख्य नियोक्ता या नात्याने मुंबई महानगरपालिकेने कामगारांना चुकती करावी व मागाहून कंत्राटदाराकडून वसूल करावी अशी मागणी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारती राजुलवाला यांच्या कडे २१ मे २०२४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला पळवाटा शोधणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या डॉ.भारती राजुलवालांनी KHFM कंपनी तर्फे कामगारांना किमान वेतन दिले जाते असे खोटे उत्तर पत्रातून दिले असून पत्रात कोठेही वेतनाच्या रक्कमेचा उल्लेख केलेला नाही शिवाय कामगारांनी तक्रार केली तरच दंडात्मक कारवाई करू व पुढील कारवाई साठी मध्यवर्ती खरेदी खाते यांच्याकडे तक्रार वर्ग केली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच कामगारांचे वेतन लाटण्याच्या उद्देशाने शासनाचे , कामगार विभागाचे आदेश झुगारून नियम कायद्यांचे उल्लंघन करून कंत्राटदाराने देयके सादर करताना आवश्यक कागदपत्र जोडले नसताना मनमानी पद्धतीने बिले प्रमाणित करून पारित केली त्यामुळेच कामगारांना कमी वेतन मिळत असून कोणीही कोणाला फुकटात पाठीशी घालत नाही अनेक अधिकारी यात सामील असून या संदर्भात आयुक्तांकडे ४ तक्रारी दिल्या आहेत असूनही कारवाईत दिरंगाई होत आहे असा आरोप आरटीआय कार्यकर्ते आदित्य मैराळे यांनी केला आहे.

मनपा आयुक्त भूषण गगरानी यांना त्यांचे कमिशन मिळाले असल्याने कारवाई केली जाणार नाही अशीही चर्चा कंत्राटी कामगारांमध्ये सुरू आहे. मुंबई उपनगरातील १० मनपा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात एकूण ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे सिद्ध होईलच त्यामुळे KHFM कंपनी आणि लेखा अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी , डॉ.भारती राजुलवालांना बडतर्फ करावे तसेच KHFM या कंत्राटदार कंपनी काळया यादीत टाकावे आणि कामगारांना कंत्राटी कामगार कायदा कलम २१(४) नुसार पगारातील फरकाची रक्कम मुंबई महानगर पालिकेने चुकती करावी व मागाहून कंत्राटदाराकडून वसूल करावी अशी मागणी दलित युथ पँथर चे मुंबई सचिव आदित्य मैराळे यांनी मनपा आयुक्त भूषण गगरानी ,संजय कुऱ्हाडे उपायुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग , कामगार आयुक्त ब , उपनगरीय प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या कडे पत्राद्वारे केली असून मागण्या पूर्ण न झाल्यास प्रमुख वैद्यकीय अधीक्षक उपनगरीय रुग्णालय , भाभा रुग्णालय , बांद्रा (प.) यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटने तर्फे दिला आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!