श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त न्यू इंग्लिश स्कूल आणि गुरुवर्य काकासाहेब सप्रे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, देवरुख येथे प्रा. सीमा शेट्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण देशपांडे यांनी करताना, मराठी भाषा वापरासंबंधी विद्यार्थ्यांमधील अनास्था, भाषेची अवहेलना इत्यादी गोष्टींचे वास्तव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. सीमा शेट्ये यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेची पूर्वपिठीका, मराठीचा समृद्ध वारसा, मराठी भाषेतील कथा, कादंबरी इत्यादी विविध वाड्मय प्रकार, मराठी भाषेमुळे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी, मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज, इत्यादी मुद्द्यांना स्पर्श करत वाचनातून समृद्ध व्यक्तिमत्व आकारास येते असे प्रतिपादन केले. प्रा. वसंत तावडे यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमांची गरज या कार्यक्रमात स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वेदिका फोंडके या विद्यार्थिनीने केले.
फोटो- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. सीमा शेट्ये आणि उपस्थित विद्यार्थी.