देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने न्यू इंग्लिश स्कूल, पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल व आठल्ये-सप्रे-पिञे महाविद्यालय यांचे एकञितपणे संपुर्ण वंदे मातरम् राष्ट्रगानाचे सामूहिक गायनाचे आयोजन केले होते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तीर्ण मैदानावर उल्हासपूर्ण वातावरणात सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सन्मा. स्व. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखीत ‘वंदे मातरम्’
या गीताला यावर्षी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संस्थेच्यावतीने सामुदायिक राष्ट्रगानाचे आयोजन करण्यात आले होते. या गीतात कवींनी भारत मातेचे सुंदर, भव्य व उदात्त वर्णन केले आहे. वंदेमातरम या अलौकिक मंञाने संपूर्ण देशाला नवी संजीवनी दिली. या गीतातील भाव, बोध, रचना, रस इ. भारतीयांच्या मनात कायम राहतील आणि आपली ही भारत भूमी सदैव सुजलाम, सुफलाम, सुष्मिता व भूषिता राहील हा पविञ हेतू या गीतात आहे.
या कार्यक्रमाला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, उपाध्यक्षा नेहा जोशी, ॲड. वेदा प्रभुदेसाई, नितीन शेडगे आणि संस्थेचे पदाधिकारी, तिन्ही शैक्षणिक आस्थापनातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तिन्ही आस्थापनातील सुमारे १,६५० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता आणि स्व. बँकिंग बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांनी केला. यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यार्थिनी धनवेशा मुंडे हिने करून उपस्थितांनी त्यानंतर म्हटले. मुग्धा कुलकर्णी हिने संपूर्ण वंदे मातरम् गीताचा मतीतार्थ वाचून दाखवला.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी उपस्थितांना संपूर्ण वंदे मातरम् गीताचा उद्देश व महत्त्व स्पष्ट करून, प्रत्येक देशवासीयांची देशाच्याप्रती असणारी जबाबदारी व कर्तव्य विशद केली. राष्ट्रसेविका समितीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शैक्षणिक आस्थापनांमध्ये यापुढे प्रत्येक दिवशी राष्ट्रगीतानंतर ‘संपूर्ण वंदे मातरम्’ म्हटले जाईल असे संस्थाध्यक्ष श्री. भागवत यांनी घोषित केले. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी २५ जानेवारी रोजी संस्थेच्यावतीने सामुदायिक ‘संपूर्ण वंदे मातरम राष्ट्रगानाचा कार्यक्रम’ होणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने देवरुख परिसरातील १२ शाळांना ‘संपूर्ण वंदे मातरम्’ गीताचा फलक व माहितीपत्रक भेट देण्यात आले.
फोटो- १. ‘संपूर्ण वंदे मातरम्’ राष्ट्रगानात सहभागी झालेले संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी.
२. ‘संपूर्ण वंदे मातरम्’ राष्ट्रगानात सहभागी झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी.
