बातम्या

श्री पतित पावन मंदिर संस्था, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ यांचा माघी गणेशोत्सव.

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने दातृत्वभूषण कै.भागोजीशेे कीर यांनी बांधलेले आणि लोकार्पण केलेले श्री पतित पावन मंदिर हे रत्नागिरीतील सामाजिक समरसतेचे प्रतीक मानले जाते. दोन जन्मठेपेची शिक्षा भोगून परत आल्यानंतर ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केले. 1924 ते 1937 अशी तेरा वर्ष ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे बहुमोल कार्य हाती घेतले आणि या कार्याचा भाग म्हणूनच या मंदिराची स्थापना झाली .या मंदिरामध्ये सर्व हिंदू समाजाला गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करुन पूजा करण्याचा मान दिला जातो. भारतातीलच नव्हे तर जगामधील हे एकमेव मंदिर आहे. याच मंदिरामध्ये अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी उत्सवाचे 96 वे वर्षे आहे. उत्सवामध्ये धार्मिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणे  आणि त्यांच्या कलागुणांना संधी मिळणे हाच या कार्यक्रमांचा उद्देश असतो. याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी श्रींच्या मूर्तींची सवाद्य आगमन मिरवणूक संपन्न होणार आहे गणेश चतुर्थीला म्हणजेच पहिल्या दिवशी सायंकाळी महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि संध्याकाळी कीर्तन आयोजित केले आहे. रात्री नऊ वाजता मंदिराच्या प्रांगणात नव्यानेच उभारलेल्या सर्व सोयीने युक्त अशा भव्य रंगमंचाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री उन्मेष शिंदे आणि मंडळाचे अध्यक्ष श्री मंदार खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. हा भव्य रंगमंच  मंडळाचे कार्यकर्ते श्री मंदार खंडकर यांच्या  प्रयत्नातूून साकार झाला आहे.शुभारंभाचा प्रयोग म्हणून मंदिराच्या कार्यकर्त्या महिला आणि बालगोपाळ मंडळी यांचा मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा मागोवा घेणारा “लखलख चंदेरी” हा कार्यक्रम सादर होणार आहे . मंडळाच्या कार्यकर्त्या सौ स्वाती शेंबेकर या असे विविधरंगी कार्यक्रम गेल्या अनेक वर्ष सादर करीत आहेत. रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सहस्त्रावर्तने आणि दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी “होम मिनिस्टर “हा महिलांचा कार्यक्रम आहे. सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी रात्री अनुक्रमे “लव लग्न लोच्या” आणि “कोण नाय कोनचा” ही नाटके सादर होणार आहेत. बुधवार रात्री नऊ वाजता कथ्थक नृत्य सादर होणार आहे. गुरुवार रात्री महिलांचे नमन सादर होणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी भव्य विसर्जन मिरवणुकीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. गेली अनेक वर्ष अखिल हिंदू गणेशोत्सवामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांकडून आणि गणेश भक्तांकडून उदंड आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याही वर्षी गणेशोत्सवामध्ये सादर होणाऱ्या सर्व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांना सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.  दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!