देवरुख : देवरुख
शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन, एकता शपथ व दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमा पूजनाने केली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह माजी सैनिक पुंडलिक पवार, सूर्यकांत पवार, महेश सावंत, सुभाष मोरे, अमर चाळके आणि नायब तहसीलदार जयविजय पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. यावेळी प्रा.शेट्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. *'राष्ट्रीय एकता दिवस'* व *'राष्ट्रीय संकल्प दिवस'* यामागील संकल्पना व उद्देश स्पष्ट केला. यानंतर *'राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ'* प्रा. धनंजय दळवी यांनी सर्व उपस्थितांना दिली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. भारतीय महिलांनी सरदार व जनतेने भारताचे लोहपुरुष ही उपाधी देण्यामागील कारण मीमांसा याप्रसंगी प्राचार्य महोदयानी केली. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते याबाबतची काही उदाहरणे प्राचार्यांनी उपस्थितांसमोर मांडली. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतीला उजाळा देताना इंदिराजींचे बालपण, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, राजकीय व सामाजिक कार्य, केंद्रीय मंत्री ते भारताच्या पंतप्रधान, तसेच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार व मानसन्मान या संबंधित आढावा याप्रसंगी घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी *'एकता दौड (Unity Run)'* चे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये महाविद्यालयातील २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एन सी सी व ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी ओरस, सिंधुदुर्ग मधील कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक, अग्निविर प्रशिक्षणार्थी यांचा समावेश होता. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सैनिक प्रशिक्षक, एन सी सी सब-लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये, एन सी सी केअर टेकर प्रा. सानिका भालेकर यांनी मेहनत घेतली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वर्गांच्या ग्रुपवर महत्वपूर्ण माहिती व युट्युब लिंक पाठवण्यात आल्या. यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात येथील राष्ट्रीय एकता दिवस पोलीस परेडचे प्रक्षेपण, वल्लभभाई पटेल व इंदिराजींच्या जीवनावरील माहितीपटांचा यामध्ये समावेश आहे. ही सर्व माहिती व युट्युब लिंक ग्रंथपाल प्रा.सुभाष मायंगडे यांनी उपलब्ध करून दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आर्मी व नेव्ही एन सी सी युनिट आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वप्नाली झेपले, सहाय्यक स्वप्निल कांगणे व अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी कौतुक केले.
फोटो- १. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, सोबत प्रा. शेट्ये, प्रा.मायंगडे.