रत्नागिरी : पुणे जांभूळ रोडवर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका तरुणाची हत्या करण्यात झाले. चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने घबराट निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांनी वेगवान तपास करीत केवळ दोन तासांमध्ये तीन संशयित आरोपींना जेरबंद केले. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय २१ वर्ष, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. एक्झर्बिया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांनी सौरभ मयेकरचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली.

या प्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील १८ वर्षीय संशयित आरोपी व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.
सौरभ मयेकर याचे आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडण झाले होते. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटरने वार करण्यात आला होता. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
दखल न्यूज महाराष्ट्र..

