मंडलाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय,अराजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव.
गणेशोत्सवाच्या प्रारंभी मिळालेले दायित्व आनंददायी. – श्री. रूपेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया.
संगमेश्वर : नुकतीच भाजपाची जिल्हा कार्यकारिणी घोषित झाली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुकत्याचे वातावरण होते. अशात अनेक कार्यकर्ते तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने संगमेश्वर (दक्षिण) च्या नेतृत्वाची जबाबदारी पक्षाने आपल्याच द्यावी यासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. मात्र आज मंडलाध्यक्षांची घोषणा होऊन अखेर श्री. रूपेश कदम यांची सरशी झाली.

यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी रूपेश कदम यांना शुभेच्छा दिल्या. इच्छुक उमेदवारांनीही पक्षादेश शिरोधार्य मानत श्री. कदम यांचे अभिनंदन केले. त्यामुळे माजी अध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांचे उत्तराधिकारी म्हणून श्री. कदम यांची सुरुवात सकारत्मक झाल्याचे दिसून आले. रूपेश कदम यांचे राजकारण विरहीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी असलेले संबंध स्नेहपूर्ण असल्याने इतर पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मा. जि.प. अध्यक्षा सौ. रश्मी कदम यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या श्री. रूपेश कदम यांनी विविध सामाजिक आंदोलने यशस्वी केली आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांशी सौहार्दपूर्ण व्यवहार या गोष्टी त्यांना या पदापर्यंत घेऊन गेल्या अशी चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मंडलाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते म्हणाले – “या पदापर्यंत पोचण्यासाठी मी मेहनत घेतली आहे हे खरे असले तरी अंतिम ध्येय नाही याची मला जाणीव आहे. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब, माजी खासदार मा. निलेश राणे साहेब, जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजेशजी सावंत साहेब आदी पक्षश्रेष्ठींनी ज्या उद्देशाने माझ्यावर हे दायित्व सोपवले आहे तो सफल करण्यासाठी पुढील काळात मी काम करेन. मा. तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी बांधलेली संघटना अजून सशक्त करण्यासाठी अथक परिश्रम करेन. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकाच सूत्रात बांधण्याचाही माझा प्रयत्न असेल. आमचे नेते मा. मोदीजी आज पंतप्रधान आहेत, २०२४ मध्येही होणार आहेत यावर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यादृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करत आहोतच. आमचे मार्गदर्शक मा. देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी माझ्या कार्यक्षेत्रातील दोन्ही विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सशक्त करण्यावर आम्ही भर देऊ. बाप्पाने पूर्वसंध्येलाच मला आशिर्वाद दिले आहेत. आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.” दखल न्यूज महाराष्ट्र
