“आधी पोटोबा मग विठोबा” मराठीतील ही म्हण खरंच दैनंदिन जीवनात लागू पडते. तुमचं जर पोट व्यवस्थित भरलं नसेल जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकत नाही. लहानपणी प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांनी जेवताना आपल्या पानात वाढले गेलेले सर्व पदार्थ मुकाट्याने खायचे असा दंडक घातलेला असायचा आणि ते कितीही आवडत नसलं तरी संपवावं लागायचं, का तर आई वडिलांचा ओरडा किंवा मार बसू नये म्हणून. पण जसं जसं वय वाढत जातं तशा तशा माणसाच्या आवडीनिवडी ही वाढत जातात. शाळा कॉलेज आणि ऑफिसमध्ये ही तुम्ही पाहिलं असेल की डब्ब्यात आवडीची भाजी नाही म्हणून एकतर तो मनुष्य जेवत नाही किंवा जर सांपत्तिक स्थिती बरी असली तर बाहेर जाऊन काहीतरी खातो. पण जर शांतपणे एकदा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या बाजूने विचार केला तर ते जे सांगत असतात ते योग्यच असते. आपल्या पोटात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तूरट हे षड्रस गेलेच पाहिजेत. हे षड्रस ज्या आहारात असतील त्या आहाराला संतुलित आहार असं म्हणतात.
माणसाने शेती करायचे तंत्र विकसित केले. या शेतीमुळे माणसाची अन्न शोधण्यासाठीची धावपळ कमी झाली. पण आता शेतीतुन जे धान्य उत्पन्न होत ते वाया जाऊ नये व आपल्याला दीर्घकाळ ते वापरता यावं या करता माणसाने अन्नपदार्थ साठविण्याला सुरुवात केली. अन्नपदार्थ साठविण्याच्या विविध पद्धती जगभरातील सर्वच मानवी संस्कृतीत आढळतात. याच कारणामुळे अन्न साठवण हा निव्वळ आहाराचा भाग नसून तो एक सांस्कृतिक ठेवा बनला आहे. अन्न टिकवण्याची सोपी पद्धत म्हणजे त्यातील पाण्याचा अंश काढून टाकणे. मानवी संस्कृती विकसित होत असताना, अन्नाचा खात्रीशीर पुरवठा होणे हा महत्वपूर्ण प्रश्न होता. अडणीच्यावेळी, प्रवासादरम्यान, किंवा पावसाळ्यात अन्नाचा साठा असावा म्हणून हे पदार्थ टिकवले जात होते. आता दैनंदिन जीवनात खाद्यपदार्थ जास्तवेळ टिकून रहावे या करता भाजणे, तळणे, वाळवणे या पद्धती वापरल्या जायच्या. कोकण प्रांतात मासे वाळवले जातात यालाच “खारवलेले मासे” असं म्हणतात. आता मासे खारवणे म्हणजे नेमकं काय केलं जातं? मासे हे हळद आणि मीठ लावून वाळवायला ठेवले जातात, यामुळे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे नष्ट होतो. तर,पठारी प्रदेशात अन्न पदार्थ नैसर्गिकरित्या टिकवण्यापेक्षा त्या अन्नपदार्थांवर काही प्रक्रिया करुन ते टिकवले जातात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पापड, कुरड्या इत्यादी. एखादा पदार्थ आहे त्या स्वरूपात तेल, मीठ, आणि मसाल्याच्या मदतीने टिकवणे म्हणजेच “खार घालणे”. भाज्या, काही निवडक फळं मीठ व इतर घटकांच्या मदतीने ओल्या स्वरूपातच क्षारता कायम ठेवून टिकवण्याची पद्धत म्हणजे “लोणचं घालणे”. मिठाला संस्कृत भाषेत “लवण” म्हणतात. लोणचं तयार करताना मिठाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आणि म्हणुनच लवणयुक्त अन्न म्हणून लोणचे हा शब्द प्रयोग रूढ झाला असावा. आता या लोणच्याचा इतिहास जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
प्राचीन आयुर्वेदात लोणचं बनवण्याची रीत नमूद केली आहे. चक्रधर स्वामींच्या चरित्रात लोणच्याचा उल्लेख आढळतो. ईजिप्शियन सौंदर्यवती क्लिओपात्राला लोणची आवडायची असं म्हणतात. नेपोलियनने तर लोणच्याचे आरोग्यदायी गुणधर्म लक्ष्यात घेऊन त्याचा सर्व सैन्याला लोणचं देण्यात यावं अशी इच्छा दर्शवली होती. आपल्या जेवणात एक पदार्थ असा आहे जो आधी आपण डोळ्याने चाखत असतो आणि त्यानंतर जिभेवर त्याचा स्वाद तरळू लागतो. केवळ दर्शनपात्रे ती चव जिभेवर रेंगाळू लागते आणि लाळेची कारंजी तोंडातल्या तोंडात उसळू लागतात. आणि तो पदार्थ दुसरा कोणता नव्हे तर तो आहे लोणचं! भारतीय खाद्य संस्कृतीची कल्पना लोणच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भारतात फळे व भाज्यांचा हंगाम आणि ऋतू पाहून त्या त्यावेळी जे पदार्थ उपलब्ध असतील ते पदार्थ व त्यांच्याबरोबर इतर मसाले व तेल योग्य प्रमाणात वापरून वर्षभर टिकतील अशी लोणची तयार केली जातात. लोणचं जसं जेवणाची रुची वाढवते तसंच लोणच्यामुळे शरीराला अनेक पौष्टिक तत्व ही मिळत असतात. लोणचं हे पाचक म्हणून काम करतं. गरोदर स्त्रियांसाठी लोणचं म्हणजे जीव की प्राण. लोणच्याची पहिली चव प्रत्येकाने आईच्या पोटात असतानाच अप्रत्यक्षपणे घेतलेली असते.
आता घरी जेवण करताना, प्रत्येकजण लोणचं खातो. लोणचं आवडत नाही असा कुणीतरी क्वचितच सापडतो. तुम्हाला कुणी विचारलं की लोणच्यां मधील तुमचे आवडते ब्रँड सांगा, तर तुम्ही क्षणाचाही विलंब न करता “रामबंधु”, “केप्र”, “प्रवीण”, “बेडेकर” यांची नावं सांगाल. पण तुम्हाला हे माहीत आहे का की आजचे हे ब्रँड्स एकेकाळी अगदी घरगुती होते व नंतर याचं व्यावसायिकिकरण व ब्रँडिंगमुळे आज हे एवढे प्रसिद्ध आहेत. तर चला आज अशाच एका घरगुती ब्रँड म्हणून सुरुवात केलेल्या लोणच्याचा ब्रँड बद्दल जाणून घेऊ. ही गोष्ट आहे नीलॉन्स पिकल्सची (Nilon’s Pickles).
1962 साली महाराष्ट्रातल्या जळगांव जिल्ह्यातील उतरण गावात वडिलांच्या अवकाळी मृत्यूमुळे मोठा भाऊ प्रफुल्ल सिंघवी यांना घराची जबाबदारी व लहान भाऊ सुरेश यांच्या शिक्षणा करता स्वतःचं उच्च शिक्षण सोडून शेती करायला सुरुवात केली. सुरेश यांनी कृषीशास्त्रात पदवी प्राप्त करून आपल्या मोठ्या भावाला शेतीत मदत करायला सुरवात केली. शेती करत असतानाच प्रफुल्ल ने सुरेश यांना कृषीशास्त्राचा वापर हा अन्न प्रक्रिया (Food Processing) उद्योगात कर असा सल्ला दिला. सुदैवानं त्यांच्या घराण्याला अन्न प्रक्रिया (Food Processing) उद्योगाबद्दल माहिती,अनुभव, आणि ऐतिहासिक पाश्वभूमी ही होती.
प्रफुल्ल व सुरेश यांच्या पूर्वजांनी दुसऱ्या महायुद्धात अन्न प्रक्रियेचं (Food Processing) कौशल्य वापरून ब्रिटिश आणि भारतीय सैन्याला प्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लिंबू रसाचा पुरवठा केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सिंघवी कुटूंबियांकडे 1500 एकर जमीन होती ज्यावर त्यांनी फळबागेची (Orchard) लागवड केली होती, व त्यामुळेच एवढ्या मोठया पातळीवर सिंघवी कुटूंबियाला लिंबू रसाचा पुरवठा करणे शक्य झाले. नंतर 1961 साली महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 [Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961] हा कायदा लागू केला व ज्यामुळे सिंघवी कुटूंबियांकडे असलेली 90% जमीन सरकार दरबारी जमा झाली. 1961ला जमीन जाणे आणि 1962 ला वडिलांचे निधन हे सिंघवी कुटुंबाला एका मागून एक धक्के होते. यातून सावरत दोन्ही भावांनी राहिलेल्या जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करू लागले. या दोन्ही भावांनी वेगवेगळ्या सामग्री वापरून जॅम, सॉस आणि लोणची इत्यादी घरगुती उत्पादनं बनवायचे प्रयोग करू लागले. ही उत्पादनं घेऊन ते बाजारात विकत असत. सिंघवी बंधुंनी त्यांची उत्पादनं नीलॉन्स (Nilon’s) या नावाचा ब्रँड अंतर्गत विकायला सुरवात केली. पण त्यांच्या उत्पादनाचा खप होत नव्हता व म्हणावा तेवढा चांगला प्रतिसाद ही त्यांना मिळत नव्हता. 1965 साली तर प्रफुल्ल यांनी आपण हा व्यवसाय बंद करू व दुसरं काहीतरी सुरू करू असा विचार सुरेश यांचा जवळ व्यक्त केला. पण सुरेशने हार न मानता आपण व्यवसाय सुरू ठेऊ अशी ठाम भूमिका घेतली. अखेर त्यांनी त्यांच्या उत्पादनात सुधारणा करून घरगुती लोणची तयार करायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे या लोणच्यांना बाजारात चांगला मिळाला व त्यामुळे त्याचा खप ही वाढला.
याच काळात भारत सरकारने मिलिटरी कॅन्टीनमध्ये विविध खाद्यपदार्थ पुरवठा करण्या संदर्भात वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. सिंघवी बंधूंची नीलॉन्स कंपनी ही नुकतीच सुरू झाली असल्याने त्यांच्या उत्पादनाची किंमत ही इतर उत्पादकांपेक्षा कमी होती त्यामुळे मिर्ची, आंबा आणि लिबांच्या लोणचं पुरवठा करण्याचा ठेका (Contract) नीलॉन्स कंपनीला मिळाला. पण म्हणतातना जेंव्हा एखादी संधी मिळते त्या सोबत नवीन आव्हानं पण मिळतात. असंच एक आव्हान नीलॉन्स कंपनीला मिळालं. नीलॉन्स कंपनीला आता सबंध भारतात असलेल्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये त्यांच्या लोणच्याचा पुरवठा करायाचा होता, व हा पुरवठा जर करायचा असेल तर तो घरगुती स्तरावरून करणे अशक्य होतं. अखेर सिंघवी बंधूंनी कर्ज घेऊन एक उत्पादन प्लांट सुरु केला व त्यांच्या लोणच्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायला लागलं. 1980च्या काळात उन्हाळ्यात घरगुती तयार करता येईल एन्जॉय (Njoy) या नावाचं शीतपेय (Cold Drink) नीलॉन्स कंपनीने तयार केलं पण रसना (Rasna) या शीतपेयाने सगळा बाजार काबीज केला व त्यामुळे एन्जॉय (Njoy) या शीतपेयाला म्हणावा तेवढा चांगला प्रतिसाद मिळाला नाही ही त्यांच्या करता एक धक्कादायक बाब होती. अजून यातून सावरतायत तोपर्यंत सुरेश सिंघवी यांचं 2001 साली अकस्मात निधन झालं व हा नीलॉन्स कंपनीला सर्वात मोठा धक्का होता. नीलॉन्स कंपनीने जळगांव जिल्ह्यात ग्रामीण भागात तिथल्या कष्टकरी जनतेला रोजगार मिळावा म्हणून 3 उत्पादन केंद्र उभी केली.
आज नीलॉन्स कंपनीचे विविध उत्पादनं ही अमेरीका, इंग्लंड, मध्यपूर्वेत, व आफ्रिकन देशात निर्यात केली जातात. फक्त लोणचं उत्पादन करणारी कंपनी ही प्रतिमा बदलण्यासाठी नीलॉन्स कंपनीने पास्ता सॉस, पास्ता मसाला, शेजवान चटणी, आणि विविध प्रकारच्या चायनिज सॉसची निर्मिती करायला सुरुवात केली. सामान्य गृहिणींना घरात पास्ता बनवता यावा या भावनेनं नीलॉन्स कंपनीने खास वेगळ्या प्रकारचा पास्ता मसाल्याचं उत्पादन करायला सुरुवात केली ज्याला बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. नीलॉन्स कंपनीने वेळ आणि परिस्थिती ओळखून आपल्या उत्पादन प्रक्रियेत योग्य ते करून नवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरात आणली. तर असा होता हा नीलॉन्स कंपनीचा प्रवास. सिंघवी बंधूंचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांना कठीण प्रसंगी प्रेरणा देईल यात शंका नाही.
संकलन आणि अनुवाद
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी.