गडद जांभळा व निळ्या रंगाच्या या पक्ष्याच्या कानावरही गडद निळ्या रंगाचा छप्पा असतो. म्हणूनच या पक्ष्यास निलकर्ण हे नाव पडले आहे. गळ्या-जवळ व कानामागे पांढरा रंग दिसून येतो. छातीपासून पोटाखालचा भाग शेपटीपर्यंत तपकिरी रंगाचा असतो. पाय लाल रंगाचे असतात. पूर्व आणि पश्चिमघाटांच्या सदाहरित जंगलांच्या परिसरातील, ओढ्यांच्या काठावर असलेल्या बांबूच्या बेटांवर एकटा वावरताना दिसून येतो. तसेच शहरांतील नदी-तलावांच्या परिसरात देखिल क्वचित आढळून येतो. पाणवठ्या-मधील मासे, लहान बेडूक व किटकांसारख्या भक्ष्याचा झुडुपाच्या काठीवर बसून, तीक्ष्ण नजरेने वेध घेत असतो. भक्ष्याची हालचाल होताच सुर मारून पकडतो. छोटा किलकिला या पक्ष्याप्रमाणे, चिची – चिची – चिची, असा हलक्या आवाजात कलकलाट करत साद देतो. ओढ्या किनारी असलेल्या मातीच्या बांधाला पोखरून, आत घरटे करतो.
विणीचा हंगाम- एप्रिल ते ऑगस्ट
पक्षिमित्र- दिपक शिंदे. ( पुणे.)