देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मोटर वाहन विभाग, महाराष्ट्र राज्याच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने ‘३६व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियान-२०२५’ अंतर्गत ‘रस्ता सुरक्षा कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती व्हावी, तसेच परिवहन कायद्यातील तरतुदी ज्ञात व्हाव्यात यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग(+२ स्तर) आणि आजीवन अध्ययन व विस्तार कक्ष विभागाच्यावतीने या महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थी आणि देवरुख परिसरातील वाहन मालक व चालक उपस्थित होते. या कार्यशाळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरीच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन करणारे वार्षिक कॅलेंडर व वाहन नियमावलींची माहिती पुस्तिका वितरित करण्यात आली.
कार्यशाळेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या राजश्री पाटील(मोटर वाहन निरीक्षक) आणि प्रदीप राठोड(सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. धनंजय दळवी यांनी कार्यशाळेचा उद्देश व महत्व स्पष्ट केले. यानंतर प्रा. स्नेहलता पुजारी यांनी आपल्या प्रास्ताविकात रस्ता सुरक्षेची गरज, वाहन चालकांची व पादचाऱ्यांची जबाबदारी विशद केली. यानंतर प्रा. धनंजय दळवी यांनी उपस्थितांना ‘वाहतूक सजगता मोहीम शपथ’ दिली.
राजश्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात परिवहन कायद्यातील तरतुदी, सुरक्षित प्रवासाचे महत्त्व, वाहन चालक व पादचारी यांनी घ्यायची दक्षता, हेल्मेट व सीट बेल्ट वापराचे महत्त्व, वाहनांची देखभाल व काळजी, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता यावर सविस्तर विवेचन केले. प्रदीप राठोड यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या सहाय्याने मार्गदर्शन करताना चालकाला रस्त्यावर संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना देणारी त्रिकोणी चिन्हे, रस्त्यावरील सोयी सुविधांची माहिती देणारी आयताकार चिन्हे, वर्तुळातील आदेश देणारी चिन्हे व या चिन्हांचे पालन न केल्यास होणारी दंडात्मक कारवाई याबाबत सविस्तर माहिती दिली. अपघात झाल्यानंतर (गोल्डन अवर्स) त्वरित कोणते प्राथमिक उपचार करावेत याबाबतही सविस्तर आढावा घेतला.
कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. धनंजय दळवी यांनी केले. तर प्रा. सुवर्णा साळवी यांनी आपल्या आभार प्रदर्शनात ‘सडक सुरक्षा… जीवन रक्षा’ याबाबत विवेचन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी सोळजाई मोटर ट्रेनिंग स्कूलच्या योगेश व आशिष धामणस्कर बंधूंचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, सहाय्यक स्वप्निल कांगणे व मधुरा वेलवणकर यांच्यासह प्रा. शिवराज कांबळे आणि संतोष जाधव यांनी उत्तम तांत्रिक सहाय्य केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, राहुल फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे कौतुक केले.