विकास कामांच्या उद्घाटनांचा बहुतांश निधी केंद्र सरकारचा तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्याचा संजय निवळकर यांनी व्यक्त केली खंत.
रत्नागिरी : राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार असले तरी रत्नागिरी स्थानिक पातळीवर मात्र या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र आजपर्यंत कोणी व्यक्त होताना दिसत नव्हते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून व्यक्त होऊ लागले आहेत. हातखंबा जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांची उद्घाटने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून होत आहेत. यावर रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संजय निवळकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणतात की, रत्नागिरी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला जात आहे. पायाखालची वाळू सरकायला लागली त्यामुळेच विकास कामांची उद्घाटन सुरू आहेत. मात्र त्या कामांपैकी बरीचशी कामे अद्यापही मंजुरी न मिळालेली, अद्याप वर्क ऑर्डर नसलेली, काही कामे टेंडर प्रोसेस मध्ये नसलेली, अशा बऱ्याचशा कामांचा यामध्ये समावेश आहे. हातखंबा जिल्हा परिषद गटातील एकूण 11 ग्राम पंचायती मधील बहुतांश कामे ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये पाणी या विषयासाठी जलजीवन मिशन योजनेचा लाख मोलाचा वाटा आहे. तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, किसान सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, लेक लाडकी योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान सडक योजना, आयुष्यमान भारत, कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृध्दी ठेव योजना, पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि भारत सरकार व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 6000 /- रुपये थेट केंद्राचा निधी आणि 6000/- रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत. अशा अनेक योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या असून त्या योजनांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याही निधीतून रस्ते, गटारी, संरक्षण भिंत, पुल, अशी बरीचशी कामे त्यांचे निधीतून होत असताना सुद्धा तेथे तालुक्यातील अनेक ग्राम पंचायती मधे तेथील सरपंच, आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे स्वतः श्रेय घेऊन हे सर्व आम्हीच करत आहोत असे जनतेसमोर भासवत आहेत पण, ” ये पब्लिक है सब जानती है”.

गेली 20 वर्षे जनतेने अनेक योजना आणि विकास कामांची स्वप्ने बघितली आहेत. आणि ती स्वप्ने आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यात शिंदे- फडणवीस सरकार च्या माध्यमातुंन सत्यात उतरताना दिसत आहेत त्यामुळे जनतेला याचा नक्कीच लाभ होताना दिसत आहे. परंतु याच योजनांच्या जीवावर प्रत्येक ठिकाणी हे मी केले, मी आणले असे जनतेला सांगून, भासवत असल्याचे स्थानिक सरपंच पासून ते तालुक्याच्या लोक प्रतिनिधी पर्यंत दिसून येते. लवकरच केंद्र सरकार व राज्य शासन यांचे मार्फत असलेल्या योजना व आपल्या तालुक्यात त्याची झालेली अमलबजावणी याबाबत माझे नेते माजी खासदार नीलेशजी राणे , भाजप जिल्हाध्यक्ष दीपक जी पटवर्धन , माजी आमदार बाळासाहेब माने, महिला जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या ताई जठार, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे या सर्वांना घेऊन शत: प्रतिषत भाजपा चे स्वप्न सत्यात उतरवन्यासाठी जनतेच्या दारोदरी याची माहिती पत्रके वाटपाचा कार्यक्रम मी स्वतः दारोदारी जाऊन करणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदमधे विविध विकास कामाची कंत्राट, कंत्राटदार ऑनलाईन पद्धतीने भरत असतात. मात्र रत्नागिरीमध्ये कोणत्या कामाचे कंत्राट कोणी भरायचे यासाठी अवैध टीम कार्यरत आहे व त्या टीमच्या माध्यमातून संबंधित कामाचे कंत्राट कोणी भरायचे हे त्या टीमचा म्होरक्या पुढारी ठरवतो. आणि त्याच्या आदेशाप्रमाणे सर्व कामे केली जातात. त्या मध्ये कोणतीही नियम – नियमावली पाळली जात नाही. पुढाऱ्यांच्या मर्जीतील कंत्राटदारां व्यतिरिक्त इतर कोणी ते कंत्राट भरल्यास त्याला अडचणीत आणण्याचे काम हे पुढारी करीत आहेत. एवढेच नाही तर जिल्हा परिषद आणि बांधकाम विभाग यामधील अधिकारी देखील ठेका हवा असल्यास अमुक एका माणसाला जाऊन भेटा त्यांनी सांगितले तर आम्ही तुम्हाला मदत करू असे सांगत असल्याचे निवळकर यांनी सांगितले.
मुंबई – गोवा, तसेच मुंबई – नागपूर हायवे वरील रस्त्याला खड्ड्यांचे साम्राज्य होते त्या रस्त्याला पॅचिंग होण्यासाठी, खड्डे भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाठपुरावा केल्या नंतर सदर रस्त्याला पॅच वर्क करून तात्पुरते खड्डे भरन्याचे काम या स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी केले. परंतु एका पावसात च ते पॅच वर्क निघून पुन्हा खड्डे दिसू लागले. या खड्ड्यांमुळे कोणाचा जीव गेल्यास आम्ही शांत बसणार नाही संबंधित ठेकेदाराच्या विरोधात लढू…
रत्नागिरी एमआयडीसी मधे उद्योगसाठी जागेचे लिलाव केले जात असून त्यासाठी या पुढाऱ्यांनी आपलेच लोक बोली लावण्या साठी ठेऊन एमआयडीसी मधील बऱ्याचशा जागा काबीज केलेल्या आहेत. त्यामुळे उद्योगांसाठी स्थानिक भूमिपुत्रांना जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्राला नवोदित उद्योग सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध होणे कठीण जात आहे. लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते , परप्रांतीय यांचेकडून सहजरीत्या प्लॉट एमआयडीसीमध्ये घेतले गेले आहेत, मात्र स्थानिकांना, बेरोजगारांना यामध्ये प्लॉट उपलब्ध होत नाहीत. परिणामी जिल्ह्यातील तालुक्यातील नवोदित उद्योजकांचा हिरमोड होत आहे आणि नवोदित उद्योजक तयार होत नाहीत.
फक्त आपले समर्थक, आपले कार्यकर्ते यांचाच विकास करण्यासाठी सर्व गोष्टी आहेत का.? विरोधी मतप्रवाहातील लोकांना जाणून-बुजून त्रास दिला जात आहे का? रत्नागिरीतील नवीन उद्योजक तयार करायचेच नाहीत का? कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे रत्नागिरीचा विकास आहे का.? असे अनेक प्रश्न भाजपाचे तालुका उपाध्यक्ष यांनी बोलताना उपस्थित केले आहेत. संजय निवळकर यांनी मित्र पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
