रत्नागिरी : जालना जिल्ह्यात मराठा उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याविरोधात राज्यभर मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने करण्यात येत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून पोलिस व राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा-लाख मराठा, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, अशा घोषणा देत सकल मराठा समाजाने आंदोलन केले. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या मोर्चामध्ये सकल मराठा समाजातील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. याप्रसंगी मराठा समाजातर्फे नीलेश भोसले यांनी सांगितले की, सकल मराठा समाज राज्य सरकारचा निषेध करत आहे. येथे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले आहेत, त्यांनी पक्षाचे लेबल बाजूला ठेवूनच सहभाग घेतला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही.’
कौस्तुभ सावंत यांनी सांगितले की, आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मराठा समाज बांधवांनी उपोषण केले. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा राज्यभरातून मराठा समाजातर्फे निषेध नोंदवण्यात येत आहे. याकरिता रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे. यापुढे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर झालेल्या हल्लेखोरांवर कारवाई होण्याकरिता महाराष्ट्रात सकल मराठा समाजातर्फे ५८ मोर्चे शांततेत काढण्यात आले. मराठा समाज शांत होता. परंतु त्याला त्रास देण्याचे काम केले जात आहे. याविरोधात मराठा समाज तीव्र लढा देईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा समाजाचेच आहेतत्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनावेळी घोषणाही देण्यात आल्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
… तर भावनांचा उद्रेक होईल
मराठा समाज मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने, मोर्चे काढत असताना जालना येथे घडलेली घटना ही मराठा समाजाच्या भावनांना धक्का पोहचला आहे. अशा घटनांमुळे भविष्यात उद्रेक होईल, असे घडल्यास त्यासाठी शासन जबाबदार राहील, असा इशारा या वेळी देण्यात आला. मराठा समाजाचे विषय हे राजकारणाचे भांडवल न करता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी सोडवावेत, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले. दखल न्यूज महाराष्ट्र.
