मुंबई विद्यापीठाच्या ५६व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची घोडदौड कायम ठेवताना आणखीन १ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावून फाईन आर्ट कला प्रकारातील आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयालाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ५६व्या युवा महोत्सवातील फाईन आर्ट कला प्रकारांमध्ये आतापर्यंत ३ सुवर्ण पदके व २ रौप्य पदकांना गवसणी घातली आहे. फाईन आर्ट मधील *'मेहंदी डिजाइन'* या कला प्रकारात सिद्धी लवू शिंदे हीने *'संगीत वाद्य'* या विषयावर आपली कला सादर करून सुवर्णपदक प्राप्त केले. सिद्धी शिंदे हिने श्रावणी सुनीलदत्त राजवाडे हिच्या हातावर मेहंदी काढून हे यश प्राप्त करून दिले. तर अक्षय वहाळकर याने *'रांगोळी'* या कलाप्रकारात *'निसर्ग चित्र'* साकारून रौप्य पदक प्राप्त करून चमकदार कामगिरी केली आहे. सिद्धी व अक्षय यांनी मिळविलेल्या यशाच्या अगोदर सुयोग राहटे याने कार्टूनिंगमध्ये सुवर्णपदक व क्ले मॉडेलिंगमध्ये रौप्यपदक, तर अक्षय वहाळकर याने पोस्टर मेकिंग स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाला आतापर्यंत एकूण ३ सुवर्ण व २ रौप्य अशी एकूण ५ पदके प्राप्त करून दिली आहेत. सुयोग, अक्षय आणि सिद्धी यांना कलाशिक्षक सुरज मोहिते व विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृगारे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- सिद्धी शिंदे व अक्षय वहाळकर सोबत मार्गदर्शक विलास रहाटे यांच्यासह आणि दोघांच्या पदक प्राप्त कलाकृती. दखल न्यूज महाराष्ट्र.

