राजापूर – (प्रमोद तरळ) भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी ८० लाख रुपयांच्या नळापाणी प्रकल्पाचा रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
बागवाडी, बाजारवाडी, गांगणवाडी, टक्केवाडी या चार ठिकाणी शासकीय विहिरी असून तिथून संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबाला नळपाण्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सदर प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राज्य स्तरीय दिशा समितीचे सदस्य श्री. संतोष गांगण यांच्या शुभहस्ते व सरपंच श्री. विजय जड्यार यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. भाजप तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, जेष्ठ भाजप नेते मनोज गांगण, माजी सरपंच राजेश नलावडे,महेंद्र गांगण, ग्रामपंचायत सदस्य निलेश चांदे, प्रीती नमसे, समीक्षा चव्हाण तसेच वरिष्ठ समाजसेवक प्रभाकर पळसुलेदेसाई व अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.यावर्षी पाऊस खूपच अल्पप्रमाणात झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने वेळेवर कार्यान्वयित झाल्यास पाणीटंचाईपासून बचाव होऊ शकेल.
तसेच आमदार मा. श्री. प्रसाद लाड यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन अंतर्गत रु पंधरा लाख कदमवाडी रस्त्यासाठी मंजूर असून सदर रस्त्याचे भूमिपूजन निधी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. काशीनाथ माटल यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपप्रणित केंद्र सरकार व राज्य सरकारकडून रायपाटणसाठी भरीव योगदान मिळाल्याने रायपाटण ग्रामस्थ सरकारचे कौतुक करीत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.