रत्नागिरी, दि.31 प्रतिनिधी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार राजेश मयेकर आणि पत्रकार भुषण पुरस्कार न्युज१८ लोकमतचे पत्रकार सचिन सावंत यांना जाहीर झाला आहे. दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी सकाळी अकरा वाजता रा.भा.शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणों यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी दिली.
द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा दरवर्षी सर्वोकृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवते. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार राजेश मयेकर यांना जाहीर झाला आहे. राजेश मयेकर हे तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी आवृत्तीप्रमुख पदाचीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. विविधांगी विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. पत्रकार भूषण पुरस्कार न्युज१८ लोकमतचे पत्रकार सचिन सावंत यांना जाहीर झाला आहे. सचिन सावंत यांनी अल्पावधीतच पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. गेली तीन वर्ष ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी आरएनओ, माझे कोकण या वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले होते. सध्या ते न्युज १८ लोकमतमध्ये काम करतात. जिल्ह्यातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेतून केले आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धा परीक्षांचे महत्व व्याख्यानमाला
रत्नागिरीमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्येही पुढे यावेत याकरीता द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने गतवर्षीपासून स्पर्धा परीक्षांवर व्याख्यानमाला आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धा परीक्षांचे महत्व या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे. दि.५ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अ. के. देसाई हायस्कूल येथे व्याख्यानमालेला प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि.६ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर सभागृहात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
