डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव: २०२३-२४' चे सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमने २ सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि २ कांस्यपदके प्राप्त करून आपली कर्तबगारी सिद्ध केली. या फाईन आर्ट टीममध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या सुयोग चंद्रकांत रहाटे आणि अक्षय शिवाजी वहाळकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुयोग रहाटे याने क्ले-मॉडेलिंग(मातीकाम) या कला प्रकारात सुवर्णपदक, तर अक्षय वहाळकर याने रांगोळी आणि पोस्टर मेकिंग ह्या दोन कला प्रकारात कास्यपदकाला गवसणी घातली. मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघाला डॉ. सुनील पाटील(संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, मुंबई विद्यापीठ), श्री. निलेश सावे(सांस्कृतिक समन्वयक, मुंबई विद्यापीठ) यांच्यासह फाईन आर्ट प्रकारांसाठी श्री. केशर चोपडेकर आणि श्री. विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सुयोग रहाटे आणि अक्षय वहाळकर यांची पंजाब कृषी विद्यापीठ, जालंधर, पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघातून यापूर्वीच निवड झाली आहे. सुयोग आणि अक्षय यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. विकास शृंगारे, कलाशिक्षक श्री. सुरज मोहिते यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- इंद्रधनुष्य युवा महोत्सवातील सुयोग रहाटे व अक्षय वहाळकर यांच्या पदकप्राप्त कलाकृतींचा कोलाज.