राजू सागवेकर | राजापूर – करेल
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा करेलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी कलेत व क्रीडा क्षेत्रात चमकावे, यासाठी शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नैसर्गिक क्रीडा कौशल्य आणि कलागुण पुढे येण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या श्रीमती जावकर मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या प्रेरणेतूनच, विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले. उत्स्फूर्त लयबद्ध हालचाली, तालबद्ध नृत्य आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. विद्यार्थ्यांनी उत्तम संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक श्री. वसावे सर, शिक्षिका श्रीमती जावकर मॅडम, पोलीस पाटील सौ. श्रुती सागवेकर व श्री. प्रकाश आंबेलकर, अंगणवाडी सेविका सौ. नाचणेकर व सौ. आंबेलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुरज आंबेलकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, दत्तजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या या विशेष सोहळ्याने विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मनात आनंदाचे व उत्साहाचे रंग भरले! दखल न्यूज महाराष्ट्र