मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद..
मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने १८ ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या संदर्भात निवेदन दिले. गेली अनेक वर्षे सी.ई.टी सेल च्या गैरकारभारमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होत असल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे दिवस पूर्ण न होणे. निकाल उशीर लागणे अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७ पासूनच्या अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रखडलेल्या असुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील २४,८३,४८३ प्राप्त अर्जांपैकी १९,९७,२३२ अर्ज पडताळणी झाली असून त्यापैकी फक्त ११,९७,०२३ विष्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित असून या विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे तात्काळ शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच खाजगी विद्यापीठामार्फत आवाजवी शैक्षणिक शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून खाजगी विद्यापीठ शुल्क नियंत्रण समिती निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. १००% प्राध्यापक भरती करण्यात यावी. वसतिगृहाची संख्या वाढवून अनेक वस्तीगृहांची असलेली दुरावस्था सुधारवण्यात यावी. सर्व विद्यापीठांचे तक्रार निवारण व परीक्षा विभागाचे कामकाज डिजिटल पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाइन करण्यात यावे. शासकीय महाविद्यालयांचे शुल्क कमी करण्यात यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी च्या दृष्टीने तातडीचे पाऊले उचलावीत तसेच महाराष्ट्रात अनेक वर्षे बंद असलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुका पुन्हा सुरू करण्यात याव्या या आग्रही मागणीसह विस्तृत चर्चा करण्यात आली.
अभाविप च्या मागणीपत्राबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत अभाविप ला आश्वस्त केले.
यावेळी राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार, कोंकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, मुंबई महानगर मंत्री ओमकार मांढरे, विभाग संयोजक निधी गाला, निशा भारती हे उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र