आठ जून २०१७ रोजी लावलेल्या छोट्याशा वड्याच्या रोपटाचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहताना आनंद आणि समाधानाने उर भरून येतो. यंदा आमच्या या बाळराजांनी ९व्या वर्षात पदार्पण केले .वटपौर्णिमेचा सण सर्व महिलांना आपल्या परिसरात साजरा करता यावा या हेतूने आम्ही हे वृक्षारोपण केलं होतं आणि आमचा हेतू साध्य झाला. कित्येक महिला परिसरात वटवृक्ष नाही म्हणून आपली नोकरी धंदा बंद ठेवून आपापल्या गावी जात होत्या .त्या आता इथेच राहू लागल्या.
परंतु संध्याकाळी आम्ही जेव्हा त्या झाडाखाली गेलो त्यावेळी त्या वृक्षाच्या मुळाशी वाण म्हणून वेगवेगळी फळ, धान्य ,पिठाचे दिवे ,ब्लाऊज पीस ,तेलाचे दिवे इत्यादी वस्तू ठेवलेल्या दिसल्या आम्ही नंतर त्या वस्तू गोळा करून सर्व फळ गुरांना खाऊ घातली ब्लाउज पीस व दिवे गरिबांना दिले नाही तर या सर्व वस्तू कुजून तिथे घाण व दुर्गंधी पसरली असती .त्यामुळे महिलांना एक नम्र आवाहन करावसं वाटतं की परंपरा ,विधी म्हणून तुम्ही ठेवलेल्या काही वस्तू तिथे न ठेवता ते विधी झाल्यावर गरजू लोकांना द्यावं म्हणजे ते कर्म सत्कारणी लागेल आणि वडाच्या फांद्या आणून तुळशीत पुजणाऱ्या महिलांना पर्यावरणाचं महत्त्व समजण्यासाठी आणखी किती काळ जावा लागणार आहे हे देव जाणे!
दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला स्वयंसेतू आणि जायंट सिटीसहेली या ग्रुपच्या महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यात प्रतिभा प्रभुदेसाई ,आरती दामले ,सीमा ठाकरे ,शितल शेटे ,दिपाली नार्वेकर ,मधुमिता नेने ,कांचन शिंदे ,सुवर्णा चौधरी, वंदना वेर्णेकर ,सुशीला कवितके आणि श्रद्धा कळंबटे व इतर महिलांचा समावेश होता . सुरुवातीला या महिलांनी वटवृक्षाला मनोभावे वंदन केलं आणि पर्यावरण रक्षण व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी श्लोक म्हटला.आरती दामले यांनी ‘ही पौर्णिमा हे चांदणे ‘हे गीत आपल्या सुमधुर आवाजात गाऊन या कार्यक्रमाला रंगत आणली श्रद्धा कळंबटे यांच्या संकल्पनेतून त्यांनी व जायंट सिटी सहेलीच्या मैत्रिणींनी लावलेल्या वृक्षांना नावाच्या पाट्या लावण्यात आल्या यात वड, पिंपळ ,औदुंबर, अर्जुन आणि कडूनिंब या झाडांचा समावेश आहे. बघा आमचे हे विचार पटतात का तुम्हाला? आणि पुढच्या वर्षी तुम्हीही आमच्या या उपक्रमात अवश्य सामील व्हा.
दखल न्यूज महाराष्ट्र .