महाराणी येसूबाई फाऊंडेशन राजधानी साताराचा उपक्रम.
चिपळूण : (ओंकार रेळेकर ) स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या इतिहासात आपल्या सोशिक, सोज्वळ आणि सात्विक, धीरोदात, निःस्वार्थी वर्तणुकीद्वारे हे मराठी राज्य पुन्हा उभे करण्यासाठी आपल्या अपूर्व त्यागाने ज्यांनी तब्बल २९ वर्षे कारावास स्वीकारला.शत्रूच्या कैदेतही त्या स्वाभिमानाने राहिल्या. सत्य, सत्व, अस्मिता, चारित्र्य, स्वाभिमान या बाबींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही.त्यांच्या अंतःकरणात जतन केलेले स्वराज्य प्रेम व स्वधर्मप्रेम याबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही त्या कोकणातील शृंगारपूर (संगमेश्वर ) च्या माहेरवाशीण महाराणी येसूबाईसाहेब यांचा महापराक्रम जनतेसमोर यावा यासाठी आपण श्रीमंत महाराणी येसूबाई फाऊंडेशन राजधानी सातारातर्फे आम्ही हा प्रयत्न करीत असल्याचे कोकणचे सुपूत्र व साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे सुपूत्र असलेले साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के हे महाराणी येसूबाईंचा इतिहास व पराक्रम जगासमोर यावा यासाठी
गेले काही वर्षे काम करीत आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही ते आपल्या गावीही विविध उपक्रम राबवित असतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या मातृभूमीतील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला होता. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या राजेशिर्के यांना राजेशिर्के घराण्याचा इतिहास सर्वदूर पोहोचावा असे मनोमन वाटते. वीरकन्या,
वीरपत्नी, वीरमाता अशा विशेषणांनी युक्त असलेल्या महाराणी येसूबाईसाहेब यांनी महापराक्रमी सासरे छत्रपती शिवाजी महाराज, ज्वाज्वल्यतेजस पती युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण भारतावर राज्य करणारे पुत्र छ. शाहूमहाराज या तिन्ही छत्रपतींची कारकिर्द अनुभवली. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकवेळा त्यागही करावा लागला. युवराज संभाजी महाराजांसोबत संसार म्हणजे आगीशी खेळ होता. आपले कर्तव्य त्यांनी चोख बजावले. पण स्वराज्याच्या इतिहासात त्या दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे कार्य आजच्या समाजासमोर यावे व युवापिढीला त्यांची ओळख व्हावी यासाठी हा प्रयोग असल्याचे सुहास राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.
महाराणी येसूबाईसाहेब यांच्या या अजोड कार्याची छोटीशी दखल घेण्याचा, त्यांच्या अपूर्व त्यागाला बलिदानाला विनम्र अभिवादन करण्याचा प्रयत्न त्यांच्या राजेशिर्के या मातुल घराण्यातील म्हणून आपण श्रीमंत महाराणी येसूबाई फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. आई शिरकाई आणि आई भवानीचे आशीर्वाद पाठीशी आहेत, जनतेचेही पाठबळ मिळावे ही अपेक्षा सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केली आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*