रत्नागिरी : शहरातील डंपिंग ग्राऊंडवरील बेसुमार कचऱ्याचा प्रश्न गेली कित्येक वर्षे धुमसतो आहे. अनेक सत्ता आल्या आणि गेल्या परंतु शक्य असतानाही घनकचरा प्रकल्प उभारण्याचे धाडस कोणत्याही सत्तेचे झालेले नाही. नुकत्याच पायउतार झालेल्या शिवसेनेच्या सत्तेमधील लोकप्रतिनियांनी या विषयाला हात घातला. सुमारे एक लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या कचर्यावर बायोमायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत होते. परंतु पालिकेवर प्रशासक नियुक्ती झाली आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे येथे वारंवार आगी लागून त्याचा धूर शहरावर पसरतो आहे. रत्नागिरी पालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात नाव केले असले तरी स्वतःच्या घनकचरा प्रकल्पाबाबत पालिका अजूनही उदासीन आहे.
रत्नागिरी नगरपालिकेचे साळवी स्टॉप येथे असलेले डंपिंग ग्राउंड यावरती तेथील कर्मचारीच कचऱ्याला आग लावत असल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे. संपूर्ण पावसाळ्यामध्ये साठलेला हा कचरा सुकवून थेट जाळला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धूर आणि प्रदूषण होत आहे. या परिसरातील आजूबाजूचा कित्येक किलोमीटरचा भाग संध्याकाळच्या वेळेत धुके पडल्याप्रमाणे धुरमय झालेला असतो. मारुती मंदिर, साळवी स्टॉप, नाचणे, जेके फाईल असा मोठा परिसर या धुरामुळे व्यापला जातो. परिसरामध्ये राहणारे लोक सुशिक्षित असूनही याबाबत आक्रमक का होत नाहीत असा देखील सवाल कित्येकदा केला जात आहे. पण वारंवार यावर तक्रारी करून राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन देखील रत्नागिरी नगरपालिकेचा कचरा प्रश्न आजही कित्येक वर्षे धुमसतो आहे ही मोठी शोकांतिका आहे.
सत्ताधारी पक्षांनी, रत्नागिरीचे आमदार पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या प्रश्नाकडे डोळसपणे पाहत रत्नागिरी नगर परिषदेचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*