देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीच्या भर्ती प्रक्रियेसाठी पहिली तुकडी कोल्हापूर येथे रवाना होण्यापूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ २६ सप्टेंबर,२०२२ पासून संस्था पदाधिकारी, माजी सैनिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज अग्नीवीर प्रशिक्षण केंद्रात देवरुख परिसरातील माजी सैनिक मैदानी व लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. दररोज सकाळी ७:०० ते ०९:१५ या वेळात नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. नियमित प्रशिक्षणार्थीना पौष्टिक आहार संस्थेमार्फत मोफत देण्यात येतो. पौष्टिक आहाराचा नित्य 'डायट प्लॅन' संस्था पदाधिकारी नेहा जोशी व ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी ठरवला असून, त्यासाठी त्या मेहनत घेत आहेत. या प्रशिक्षण वर्गात ८१ मुले-मुली यांचा सहभाग आहे. प्रशिक्षण केंद्रातील पहिली १७ मुला-मुलींची बॅच व त्यानंतर ६ मुलींची जनरल ड्युटी आणि टेक्निकल पदाच्या भर्ती प्रक्रियेसाठी टी. ए. बटालियन, कोल्हापूर येथे रवाना होणार असल्याने या प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक पुंडलिक पवार, सूर्यकांत पवार, अमर चाळके, पांडुरंग शेंडगे, यशवंत खरात, सुनील जाधव, सुभाष मोरे, महेश सावंत, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आर्मी अग्निवीर भर्तीसाठी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व प्रशिक्षण प्रमुख माजी सैनिक अमर चाळके यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा देऊन प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल आदर व्यक्त करून आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
फोटो- १. शुभेच्छा समारंभात बोलताना संस्थाध्यक्ष भागवत, प्राचार्य डॉ. तेंडोलकर इतर मान्यवर माजी सैनिक.
२. शुभेच्छा समारंभाला उपस्थित अग्निवीर प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी. दखल न्यूज महाराष्ट्र.