संगमेश्वर
: तालुका शालेय खो-खो स्पर्धेचा शुभारंभ देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी विविध प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, पंच व खो-खोप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांना *'महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार'* व प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांना *'मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार'* मिळाल्याबद्दल संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक अभिजीत कदम यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संगमेश्वर तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्यावतीने सन्मानित केले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर व संस्थाध्यक्ष भागवत यांनी उपस्थित खेळाडू व शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, फणसवणेच्या अथर्व श्रीराम गराटे यांने अलीकडेच संपन्न झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र किशोर खोखो संघातून सहभागी होऊन सुवर्णपदक प्राप्त करून दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खो-खो क्रीडांगणावर संस्थाध्यक्ष भागवत यांनी विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करून दिली. आज खेळविण्यात आलेल्या १४ वर्षाखालील स्पर्धेत मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख विजयी ठरले, तर शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. तर मुलांमध्ये विजेतेपद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, फणसवणे यांनी आणि उपविजेतेपद न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख यांनी प्राप्त केले. अतिशय दुर्गम भागातील फणसवणे शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विजेत्यापदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धांसाठी पंच म्हणून राजेश सावंत, प्रमोद चिले, नथुराम पाचकले, आदम सय्यद, सूर्यकांत डवर आणि समीर कापदूले यांनी मेहनत घेतली. पुढील दोन दिवस १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धा याच मैदानावर संपन्न होणार आहेत. खो-खो स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अविनाश जाधव, तानाजी कदम, प्रा. सागर पवार यांच्यासह विविध शाळेतील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, विद्यार्थी स्वयंसेवकांसह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
फोटो- १. राष्ट्रीय खो-खो खेळाडू अथर्व गराटे याचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष भागवत, प्राचार्य डॉ. तेंडोलकर व इतर मान्यवर शिक्षक.
२. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांना सन्मानित करताना अभिजीत कदम आणि इतर मान्यवर शिक्षक.
छाया- प्रा. सागर पवार.