अखिल भारतीय ग्राहक पंचायत, राष्ट्रीय सेविका समिती, भाजपा आणि संघ परिवारातील अन्य संस्थांच्यावतीने गोळवली, संगमेश्वर येथे परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पामध्ये काशी प्रांताच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या सोनी चौरसिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. काश्मीर ते कन्याकुमारी अशी अतुल्य भारत यात्रा करण्यासाठी बाहेर पडलेल्या रोलर स्केटर्स सोनी चौरसिया, त्यांचे गुरु आणि त्यांचे २० सहकारी यांची टीम खेड, चिपळूण असा प्रवास करून संगमेश्वर येथे दाखल झाली. सर्वप्रथम कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर संपूर्ण टीम गोळवलकर गुरुजी प्रकल्पामध्ये दाखल झाली. यावेळी सर्व टीम सदस्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या या उपक्रमासाठी अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या सहसचिव नेहाताई जोशी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर सोनी चौरसिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात यात्रेमागचा उद्देश आणि प्रवासातले अनुभव कथन केले. यानंतर भाजपाचे श्री. हरीभाई पटेल, राष्ट्रीय सेविका समितीच्या निलाताई, सुनंदा जेरे मॅडम यांनीही मनोगते व्यक्त करून सर्व काशीवरून आलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थिताना गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे आभार नेहाताई जोशी यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.
*फोटो-* काशीवरून रोलर स्केटिंगद्वारे अतुल्य भारत यात्रेसाठी आलेल्या टीमचे स्वागत प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते. दखल न्यूज महाराष्ट्र