ही कहाणी एका व्हाईट कॉलर मध्ये वावरणाऱ्या दरोडेखोराची. त्याने एक सामाजिक काम गोरगरिबांना वंचितांना न्याय मिळावा एक व्यासपीठ मिळावे या दृष्टिकोनातून एक बातमी प्रसार माध्यम सुरू केले. कदाचित त्यावेळी त्यांचा उद्देशही चांगला असावा त्यामुळेच शेकडो लोक संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना जोडले गेले हा.. हा.. म्हणता म्हणता त्याच्या या व्यासपीठाचा चांगलाच प्रचार आणि प्रसार झाला कोणतेही मूल्य कोणीही न घेता समर्पण पणे काम करत मेहनत घेतली हळूहळू त्या रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात होऊ लागले होते. सर्वांनाच आनंद होत होता आपण काम करीत असलेले व्यासपीठ मोठे होत आहे याचा अभिमानही वाटत होता. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे काही खोटे नाही. या प्रसार माध्यमांमध्ये काम करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून 5000 पासून 30000 पर्यंत अनामत रक्कम घेण्यात आली. तर काहींकडून चांगल्या ठिकाणी काम देतो असे सांगून लाखो रुपये हस्तगत केले. कदाचित कोरोना काळ घरखर्च त्याने ह्याच पैशावर निभावून नेला असावा..? मग तसं त्याच्या कुटुंबाचा विचार केला तर पत्नी म्हणजे माऊलीच. गोरगरीब शेतातून काबाडकष्ट करून घाम गाळणारी. दोनही मुले चांगली सुशिक्षित. मग यालाच काय साडेसाती सुचली?
याच व्यासपीठावर काम करणारा एक गोरगरीब शेकडो किलोमीटर दूर राहून सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांची ओळख झाली आणि तो देखील या व्यासपीठाला जोडला गेला. कामदेखील प्रामाणिकपणे करत होता पण या दरोडेखोराने जणू त्याला लुटलेच. कोरोना काळामध्ये त्या गरीबाच्या घरातील कर्ता पुरुष हरपला. त्यात एका योजनेतून मिळालेले घर शासनानेच परत करा असा तगादात जाणू लावला. हे सर्व आपल्या बाबतीत चुकीचे घडते आहे हे त्याला चांगलेच कळून होते आणि हा गरीब तरुण देखील चांगला उच्चशिक्षित आहे. आपले सहकारी मित्र म्हणून त्याने ही गोष्ट या व्यक्तिशी शेअर केली. दरोडा टाकण्यासाठी चांगलाच बकरा मिळाला असे समजूनच कदाचित मी याबाबतीत तुम्हाला मदत करतो माझी चांगलीच ओळख सर्वत्र आहे. मंत्रालयापासून मी आपले काम करून देण्यास तयार आहे असे सांगितले. प्रचंड आर्थिक अडचणीत असताना कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपलेले असताना अशातच डोक्यावरील घराचे छत देखील राहणार नाही ही प्रचंड भीती असलेला हा तरुण काहीसा सुकावला. कोणाच्या तरी रूपात देवच उभा राहिला असे त्याने मत तयार केले. आणि समोरच्या व्यक्तीला तो सांगेल तसा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.

सुरू झाला मदतीचा आणि देवाणघेवाणीचा टप्पा.. सर्वप्रथम त्याने या गरीब होतकरू तरुणाचे मन जिंकण्यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार पोस्टाने सुरू केला तरुणाला त्याच्यावर विश्वास बसू लागला होता. त्यानंतर हळूहळू तुम्ही राहात असलेले घर कायमस्वरूपी मिळण्यासाठी अथवा तुम्हाला पर्यायी जागा उपलब्ध होण्यासाठी शासन दरबारी तीन लाख 50 हजार इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागेल असे सांगितले गेले. गरीब असलेल्या या तरुणापुढे मोठा पेच निर्माण झाला मात्र सर्व संकटांना सामोरे जात असताना डोक्यावरील छत जाता नये याच भीतीने त्याने नातेवाईक, आपल्या पत्नीचे स्त्रीधन, वडिलांच्या मृत्यूनंतर काहीशी मिळाली तुटपुंजी रक्कम. हे सर्व रक्कम एकत्रित करीत टप्प्याटप्प्याने सुमारे दोन लाख रुपये या व्यक्तीच्या खात्यात भरले. त्यानंतर हळूहळू जणू सत्यसमोर येऊ लागले. पहिल्यांदाच पाल चुकली ती म्हणजे या गरीब तरुणांनी या व्यक्तीकडे शासन दरबारी भरलेल्या पैशाची पावती मागितली. यावेळी मात्र सतत मागणी करून देखील पावती काही मिळाली नाही. पावती मिळाली आहे थोडे दिवसात देतो, पोस्टाने पाठवून दिली आहे दोन दिवसात पोस्टाने घरी येईल अशा पद्धतीची खोटी आश्वासनच मिळाली. संबंधित विभागाचे मंत्री महोदय यांना मी भेटण्यास जात आहे यासाठी विमान खर्च पाठवा असे सांगून त्या व्यक्तीने विमान खर्च देखील या तरुणांकडून घेतला मात्र प्रत्यक्ष भेट झाल्याचे सांगितले व आपले काम लवकरच होईल असे आश्वासनही पुन्हा नव्याने दिले. मात्र सत्य कितीही लपवले तरी लपून राहत नाही आणि खोटे कितीही पचवण्याचा प्रयत्न केला तरी ते पचत नाही असाच काहीसा अनुभव येथे आला. ज्या दिवशी ही व्यक्ती त्या संबंधित मंत्र्याला भेटण्यासाठी गेली होती त्याच दिवशी त्याच मंत्र्याचा दौरा या गरीब तरुणाच्या गावात होता आणि तो मंत्री याच लहानशा गावामध्ये वस्तीस देखील राहिला होता यावेळी मात्र या तरुणांचे डोळे धाडकन उघडले. आणि आपली चांगलीच फसवणूक होत आहे हे त्याला कळून चुकले होते. दारिद्र्याचा फेरा कुठे चुकला नव्हता त्यातच संकटांवर संकट येत होती त्यात आणि घराचे छत जाणार ही भीती प्रचंड खात होती रात्रभर झोपही लागत नव्हती अशातच वेगवेगळ्या पद्धतीने पैसा मिळवून तो या व्यक्तीला दिला होता. असा चारही बाजूंनी प्रचंड ताण या तरुणाच्या मनावर होता. अशावेळी या तरुणाने संपूर्ण पैसे परत द्या माझे काम नाही झाले तरी चालेल असा तगादा लावला. मात्र हा पांढरे शुभ्र कापडातून फिरणारा दरेडखोर हो मी तुमचे पैसे देतो कुठेही बुडवणार नाही मी दरोडेखोर नाही चोर नाही तुमचे पैसे मी तातडीने परत देणार आहे असे सांगत सांगत सुमारे आठ महिने कालावधी यात घालवला गेला. त्यांनी निर्माण केलेल्या व्यासपीठावर काम करणारे महाराष्ट्रातील शेकडो लोक एका बातमी ग्रुपने जोडले गेले होते न राहून प्रचंड ताणात असलेल्या या तरुणाने अखेर या बातमी ग्रुप वरच या व्यक्तीला विचारले माझे पैसे कधी देणार?

आणि मग सुरू झाला बातमी ग्रुप वरील चॅटिंग प्रवास.. या तरुणाचा मेसेज येतात धाड धाड अनेक जणांचे मेसेज आले साहेब आमचेही पैसे कधी देता..? यानंतर मात्र या तरुणाला चांगलीच भीती वाटली ही माझ्यासारखेच अनेक लोक या व्यक्तीच्या जाळ्यात सापडले गेले आहेत की काय?. मग या तरुणाने याच ग्रुप वर आता मी माझ्या आयुष्याचे काहीतरी बरे वाईट करून घ्यावे लागणार असा संदेश दिला. त्यानंतर याच ग्रुपमधील काही लोकांनी वयाने मोठे असल्या तरी मोठ्या बहिणीसारखे समजावून याच ग्रुप वरील एका सुशिक्षित व्यक्तीने त्या तरुणाला आधार दिला. त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला देखील लाखो रुपयाला या व्यक्तीने गंडा घातला आहे हे हळूहळू समोर येऊ लागले. आता मात्र या व्यक्तीला कुठे तोंड लपवावे हे काही कळेना. एवढ्या लोकांचे पैसे देणे देण्यासाठी काहीतरी योजना आखावी असे त्याच्या मनात चालू असावे म्हणूनच त्याने अनेक मार्गाने प्रयत्न केले. मात्र याला यश किती आले देव जाणे. नंतर मात्र या तरुणाने सतत लावलेल्या तगाता पाहता या व्यक्तीने अगदी भगवान गौतम बुद्ध यांची देखील शपथ दिली आणि मी तुमचे पैसे पंधरा दिवसात परत करतो असे सांगत 15 तारीख दिली मात्र त्याने ती तारीख देखील पाळली नाही. मग मात्र कशाचा तरी आधार असावा म्हणून त्याने मी या तरुणावरती माझी बदनामी करतो आहे असे सांगत ॲट्रॉसिटी दाखल करीन अशी धमकी देण्यास सुरुवात केली. मग ही गोष्ट ऐकून घेईल तो हा सुशिक्षित तरुण कसला त्यांनी देखील बिनधास्त दाखल करा असे सांगत व्यवहार कोणी थकविले? माझी फसवणूक कोणी केली? आणि ज्याला आपण बदनामी म्हणता? तीच गोष्ट कोणाच्या कृतीतून सर्वप्रथम घडली कोणी कोणाला फसवले कोणी कोणाला सतत पैसे परत करतो अशी आश्वासन दिली याचा विचार मात्र त्या दरोडेखोराने केलाच नसावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ॲट्रॉसिटी यासाठी विशेष प्रावधान केले खरे पण गोरगरीब व्यक्तीला न्याय मिळावा दलित, शोषित, वंचित व्यक्तीला त्याचे हक्काचे स्थान मिळावे असे प्रदीर्घ विचारातून ॲट्रॉसिटी कायद्याची निर्मिती झाली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेणारे देखील या व्यक्तीसारखे दरोडेखोर असू शकतात ही कल्पनाही करवत नाही. आणि मग अशावेळी कायद्याचा एखाद्या अनुच्छेदाचा दाखला देत कोणालाही कोणाची बदनामी करण्याचा अधिकार नाही असे सांगण्यात या व्यक्तीने धन्यता मानली.
प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य हा त्याचा दागिना असतो खरा पण तो त्या व्यक्तीने स्वतःच्या कृतीतून जपून ठेवायचा असतो हे नाकारून चालणार नाही. पैसे
परत देण्याचे मात्र नावच नाही मूळ गोष्ट त्याच तरुणाला फसवण्याची आहे हे तो सोयीस्कर विसरत होता. आणि यातच त्याने दोन वर्ष घालवली आणि आजही तो कोणासमोर येत नाही. आरोग्याची आणि नैसर्गिक आपत्तीची अशी वेगवेगळी कारण देत घरादारा पासून दूर राहत अजूनही या तरुणाची फसवणूक या व्यक्तीकडून चालू आहे. मग मात्र या तरुणाच्या मनात याविषयी कायदेशीर तक्रार करावी असे आले..

मग सुरू झाला कायदेशीर तक्रारीचा प्रवास : स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन या तरुणाने आपले म्हणणे लेखी मांडले त्याचा काहीसा वरचा तपासही सुरू झाला. मग या व्यक्तीच्या वतीने एक महिला पुढे आली आणि साहेब लवकरच सर्वांसमोर येतील असे आश्वासन अनेकदा दिले. शेवट शेवट तर मी माझे घर गहाण ठेवणार आणि सरांना मदत करणार सर कसे चांगले आहेत; कसे लोकांना फसवत नाहीत याचे स्पष्टीकरण सतत ती महिला देत होती. मात्र काही दिवसांनी सोयीनुसार या महिलेने देखील फोन उचलणे बंद केले आणि मी सरांना मदत केली तर माझे पैसे परत मिळतील का असा विचार तिच्याही मनात आला असावा म्हणूनच ही व्यक्ती देखील या विषयांपासून दूर राहू लागली. मात्र वर्षापेक्षा जास्त कालावधी लुटून गेला तरीही हा दरोडेखोर काही समोर येत नाही. पुढे येण्याच्या नवीन नवीन तारखा कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून सोशल मीडियावर देत आहे. आता हा दरोडेखोर हा शब्द मी त्याच्यासाठी काही माझ्या डिक्शनरीतला शोधून काढलेला नाही. याच व्यक्तीच्या मुलाने म्हटले की माझा बाप दरोडेखोर आहे म्हणून मी दरोडेखोर होणार का.? वडिलांविषयी माझ्याकडे कोणतीही विचारणा करू नका कारण एका सणासुदीच्या दिवशी ते घरात कलह करून निघून गेले आहे. आता या बिचाऱ्या मुलाला त्रास देणेही काही या तरुणाला पटत नव्हते शेवटी या तरुणांनी त्यांच्या मुलाची क्षमा मागितली दादा आम्ही तुम्हाला परत त्रास देणार नाही असे सांगितले. आता मात्र एकच पर्याय राहिला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल करणे. पाहूया आता तरी ही व्यक्ती समोर येते का..?
तूर्तास इतकेच..
निलेश आखाडे.
रत्नागिरी.
