रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेते हे आत्तापर्यंत देशात प्रत्येकाला माहित झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ कमळ चिन्हावर लढायची आणि प्रचंड बहुमताने जिंकायचीच असा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने केला. त्यानंतर लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर या अभियानाला अजून गती देण्याच्या उद्देशाने केंद्रातील मा. नरेंद्र मोदीजींच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘मोदी ॲट ९’ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीला उणेपुरे १० महिने शिल्लक असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून कणकवली विधानसभेचे मा. आमदार प्रमोद जठार यांना दायित्त्व मिळाले आहे. अशातच रत्नागिरी विधानसभेतून भरघोस मताधिक्य मिळावे ही केंद्रीय नेतृत्त्वाची अपेक्षा असणे स्वाभाविक होते. यासाठी अत्यंत योग्य कार्यकर्ता कोण, ज्याची नाळ थेट मतदारांशी जोडली आहे, याबाबत मंथन करण्यात आले आणि मा. आमदार बाळासाहेब माने यांचे नाव पुढे आले. त्यामुळे आता अधिकृतपणे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात बाळासाहेब माने यांचे बारीक लक्ष राहणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून बाळासाहेब रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात सक्रीय झालेले दिसत होते. सणसमारंभ, नैमित्तिक कार्यक्रम यांसाठी वेळ काढून प्रत्येक ठिकाणी उपस्थित रहाताना ते दिसत होते. त्यामुळे आत्ता अधिकृत जबाबदारी मिळाली असली तरीही जनसंपर्क अभियान खूप आधीपासून सुरु आहे. कदाचित त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानसभेची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब माने यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीत भाजपा आपला गियर बदलणार हे आता नक्की झाले आहे.
प्राप्त परिस्थितीत शिवसेना (शिंदे गट) नेते लोकसभेसाठी दावा करत असले तरीही भाजपा नेतृत्त्व मात्र कमळ चिन्हावर ही लोकसभा लढवण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे द्वंद्व चांगलेच रंगणार आहे. बाळासाहेब माने यांच्यावर निर्णायक आघाडीसाठी प्रचंड मताधिक्य मिळवण्याची खूप मोठी जबाबदारी पक्षाने दिल्याने मोठा उलटफेर होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे मा. आमदार प्रमोद जठार संपूर्ण लोकसभा क्षेत्रात वादळी प्रवास करत असताना रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेत बाळासाहेब माने आपल्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा पक्षाला कसा करून देतात हे पहाणे आगामी काळात रंजक ठरणार आहे.

