संगमेश्वर : “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचे महाराष्ट्रासाठी खासकरून कोकणासाठी असलेले योगदान” या विषयाचा आमदार अमोल मिटकरी थोडासा जरी अभ्यास केला तरी महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून आपल्याला जी संधी मिळाली आहे त्याचे चीज होईल.” असा खोचक सल्ला भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी दिला. राजकीय क्षेत्रात वावरताना भाषेची मर्यादा सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. देशाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीकाटिप्पण्या करताना कोणताही विधिनिषेध न बाळगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याबद्दल झालेली टीका एवढी जिव्हारी का लागावी हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारात आहे.
“आ. अमोल मिटकरी उत्तम वक्ते असले तरी त्यांनी आपल्या वक्तृत्त्वकौशल्याचा केवळ दुफळी निर्माण करण्यासाठी उपयोग केला आहे. खरे सांगायचे झाल्यास शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महनीय व्यक्तींची नावे घेण्याची नैतिक पात्रता त्यांच्याकडे नाही. केवळ हिंदूद्वेष याच गुणावर त्यांना आमदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या अनेक जुन्या चित्रफिती आजही उपलब्ध आहेत. लोकांच्या मनात छत्रपती शिवरायांबद्दल नितांत आदर आहे. आणि औरंगजेब क्रूरकर्मा होता हाच इतिहास सत्य आहे. असे असताना यांच्या मनात औरंगप्रेम निर्माण होणे हा शिवरायांचा अपमान नव्हे का?” असा सवाल अधटराव यांनी उपस्थित केला आहे.
“महाविकास आघाडी सरकारने आपल्या पडझडीच्या काळात घिसाडघाईने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला हिंदुत्त्वाचा डंका पिटण्यासाठी कित्येकदा या निर्णयाचा अभिमानाने उल्लेख करतात. यावेळी मंत्रिमंडळात असणारे त्यांचे सहकारी एकमताने या नामांतरासाठी तयार होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निर्णयाला पाठींबा दिला होता. मात्र आज राष्ट्रीय ‘दर्जा’ गमावल्यावर त्यांचे ‘राष्ट्रीय(?)’ अध्यक्ष शरद पवार म्हणतात, “मी काही छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणणार…” मग पवार साहेबांचा विरोध नेमका कशाला आहे? त्यांनी नामकरण केलेल्या संभाजीनगरला की ‘छत्रपती’ संभाजीनगरला? एवढे औरंगप्रेम उतू का जात आहे? असे एक ना अनेक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पडू लागले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांप्रती असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेगडी प्रेम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीतील लोकांसमोर मांडणार आहोत. ‘अमोल मिटकरी यांनी #सरडा हा शब्दप्रयोग पवार साहेबांसाठीच वापरला की काय’ अशी शंकेची पाल मनात चुकचुकते.”
“संपूर्ण राणे कुटुंब कोकणातील जनतेचे प्रतिनिधित्व करते. दादासाहेब राणेंनी अनेक लोकांची अनेक कामे केली आहेत. कोणाच्याही पाठीत खंजीर न खुपसता कर्तृत्त्वाच्या जोरावर मुख्यमंत्री होता येते ही गोष्ट केवळ दादासाहेब राणे यांच्याकडे पाहूनच कळते. त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत लक्षात राहण्याजोगी कामे त्यांनी केली. यामुळेच आजही त्यांचा दरारा कायम आहे. मा. नितेश दादा आणि मा. निलेश दादा अत्यंत आक्रमक स्वभावाचे आहेत. मात्र त्यांचा कर्मावर विश्वास आहे. तुमच्यासारखे नीतीभ्रष्ट झालेले नाहीत. त्यांची कार्य करण्याची पद्धत आम्ही जवळून पहातो आहोत. त्यामुळे तुमच्या क्षुल्लक टीकेला राणेच काय आम्हीसुद्धा धूप घालणार नाही. आपण आमदार आहात, त्यामुळे भाषेच्या मर्यादा पाळणे आपले कर्तव्य आहे. जर पवार साहेबांवरील टीका तुमच्या मनाला अस्वस्थ करत असेल तर आमच्या नेत्यांविरुद्ध अनर्गल भाषा प्रथम तुम्हाला टाळावी लागेल.” असा इशाराही प्रमोद अधटराव यांनी दिला.

