विशेष प्रतिनिधी: निलेश आखाडे
संगमेश्वर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी महिला आघाडी संगमेश्वर यांच्यावतीने ग्रामीण पोलीस दूरक्षेत्र, संगमेश्वर येथे तक्रार नोंदवली आहे. अत्यंत वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे आव्हाड आता केवळ राजकीय क्षेत्राचीच नव्हे तर सामाजिक बंधनांच्या सीमा उल्लंघून महिलांवर आपत्तीजनक भाषेत टिप्पणी करत आहेत ही बाब महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यासाठी अशोभनीय आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर त्याची सामाजिक प्रतिष्ठा लक्षात न घेता पोलिसांनी कारवाई करावी अशा स्वरूपाचे निवेदन भाजपा संगमेश्वरच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण देशमुख यांचेकडे सदर केले आहे.
“जेथे नारीचा सन्मान होतो, देवता तेथेच निवास करतात” अशा समृद्ध संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष ‘जाणते राजे’ होऊन गेले. आजही पुढील पिढीला स्त्री दाक्षिण्याचा आदर्श म्हणून त्यांचे उदाहरण देतो. त्याच राज्यात डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे करंटे जन्माला यावेत आणि त्यांनी जाहीररीत्या महिलांचा अवमान करावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. धार्मिक तेढ असो वा इतिहासाची मोडतोड; सातत्याने दुराग्रही भूमिका घेणारे आव्हाड जर आमच्या महिला नेत्यांविषयी चुकीची विधाने करणार असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. असा इशारा केवळ आम्हीच नाही तर महाराष्ट्रात भाजपाच्या सर्व महिला आव्हाड यांना देणार आहेत. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या आव्हाडांनी आधी ‘राष्ट्रवाद’ म्हणजे काय ते जाणून घ्यावे. भारताचा राष्ट्रवाद स्त्रियांना माता-भगिनींचा दर्जा देतो. मात्र डॉ. आव्हाड यांचा वैचारिक DNA हा भारतीय नाही या मा. चित्राताईंच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत.” अशी संतप्त प्रतिक्रिया तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे यांनी दिली.
तालुका उपाध्यक्षा सौ. शीतल दिंडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या अपप्रवृत्तींना आता कायद्याची जरब बसलीच पाहिजे. प्रत्येकवेळी यांच्यावर टीका झाल्या की हे एकतर बंगल्यावर नेऊन मारहाण करणार, दमदाटी करणार, भर गर्दीत महिलांशी गैरवर्तन करणार किंवा मग चारित्र्यावर शिंतोडे उडवणार. काही काळापूर्वी आपण एक जबाबदार मंत्री होतो आणि आपले सरकार जनतेप्रती असलेले दायित्त्व पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले यांची खंत उराशी न बाळगता केवळ विरोधकांना आपल्या पदाचा माज दाखवायचा हे अनैतिक आहे.”
“आमच्या चित्राताई नावाप्रमाणेच वाघ आहेत. असल्या लांडग्यांना त्या घाबरणार नाहीत. अखंड नारीशक्ती त्यांच्यासोबत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर आता त्यांचे सहकारी असलेल्या डॉ. आव्हाडांना समज देणार का? चित्राताईंची माफी मागण्यास प्रवृत्त करणार का? जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतींनी पावन झालेल्या या राज्याचे माजी मंत्री अशा प्रकारे महिलांचा अनादर करणार असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे आव्हाड सुधारतील की नाही याचे उत्तर सांगता येणार नाही पण येणाऱ्या पिढ्यांना धाक जरूर बसेल. आणि स्त्रीदाक्षिण्यदाखवण्याचे योग्य संस्कार त्यांच्यावर होतील. तरच महाराजांचे हे राज्य सर्वार्थाने सुराज्य होईल.” अशी प्रतिक्रिया संगमेश्वर तालुका सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये यांनी दिली. दखल न्यूज महाराष्ट्र.

