नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चा प्रदेश कार्यकरिणीमध्ये लीलाधर भडकमकर यांची कार्यकारिणी सदस्य तसेच कोकण विभाग संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते कामगार मोर्चाचे (तत्कालीन कामगार आघाडीचे) दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता मावळते जिल्हा सरचिटणीस संतोष बोरकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी पार पाडत असताना लीलाधर भडकमकर यांनी आव्हानात्मक परिस्थितीत आणि पुरेशा स्रोतांच्या अभावीही उत्तम संघटनात्मक कार्य केले. त्या कामाची दखल घेत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी त्यांना प्रदेश स्तरावर जबाबदारी दिली. मागील जिल्हा कार्यकरिणीमध्ये जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे जुने कार्यकर्ते संतोष बोरकर यांची कार्यक्षमता लक्षात घेत त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली आहे. या निवडींचे अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
लीलाधर भडकमकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून मंगेश चव्हाण यांचीही कामगार मोर्चाच्या प्रदेश कार्यकरिणीमध्ये प्रदेश सचिव म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे कामगार मोर्चाला दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातून दुहेरी प्रतिनिधित्व मिळाले आहे.
लीलाधर भडकमकर आणि मंगेश चव्हाण यांच्या प्रदेश कार्यकारिणी नियुक्तीनिमित्त आज दि.१० रोजी भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा कामगार मोर्चाच्या कार्यकारिणीने याचे नियोजन केले होते. यावेळी नवनियुक्त ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्राजक्ता रुमडे, द. रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळी, द. संगमेश्वर तालुकाध्यक्ष रुपेश कदम, रत्नागिरी शहराध्यक्ष राजन फाळके, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांचाही सन्मान लीलाधर भडकमकर, मंगेश चव्हाण आणि संतोष बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राजेश सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन करत कामगार मोर्चाच्या कक्षा रुंदावल्या जाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. याच वेळी सावंत यांनी कामगार मोर्चाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष बोरकर यांची नियुक्ती जाहीर केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, उदय गोवळकर, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष अमर कीर, आयटी सेल जिल्हा संयोजक निलेश आखाडे, मंदार मयेकर, मंदार खंडकर, डॉ.दिलीप पटवर्धन, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
