भविष्यात स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्या प्रत्येकासाठी स्पर्धा परीक्षेची चळवळ कोकणात उभी रहावी आणि कोकणातील युवक-युवती स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी घडावेत याकरिता देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग व आ. रा. स. अकॅडेमी ऑफ एज्युकेशन अँड करियर, रत्नागिरी यांच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीनंतरचे करिअर: एक पूर्वतयारी, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आ. रा. स. अकॅडेमीचे प्रमुख अॅड. राकेश सत्वे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या एकूण २००हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांमधील आवश्यक गुण, विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व तयारी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी याकरिता एक तासाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) कल चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण ८० विद्यार्थ्यानी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नियमित अभ्यासासह अधिकतर वाचन, मनन, चिंतन याचबरोबर विविध क्षेत्रातील चालू घडामोडींबाबत सतर्क राहून त्याची स्वतःकडे नोंद करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय निवडताना त्याच्या प्राथमिक अभ्यासापासून ते जागतिक स्थित्यंतरापर्यंत सखोल वाचन व टिपण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्यासाठी शारीरिक व्यायामसह ध्यानधारणा, योगा व प्राणायाम नियमित करून मानसिक दृष्ट्या कणखर बनले पाहिजे. थोरामोठ्यांच्या आत्मचरित्रांचे नियमित वाचन करा आणि त्यांचे विचार नेहमी कृतीत आणावेत असे आवाहनही प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे यांनी केले, तर आभार स्पर्धा परीक्षा समन्वयक, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी व्यक्त करताना, आजी व माजी विद्यार्थ्यांना भविष्यातील येणार्या स्पर्धा परीक्षा, नोकरी संदर्भ व इतर उपक्रम यांविषयी माहिती मिळावी, या हेतुने महाविद्यालयाचे 'स्पर्धा परीक्षा' या नावाने व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. याचा फायदा सर्व आजी-माजी विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी चैतन्य भागवत, सहाय्यक स्वप्निल कांगणे व रोशन गोरूले यांनी मेहनत घेतली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी कौतुक केले.
फोटो- १. मार्गदर्शक ॲड. सत्वे यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर आणि ग्रंथपाल प्रा. मायंगडे.
२. मार्गदर्शन करताना ॲड. सत्वे आणि उपस्थित विद्यार्थी.
छाया- चैतन्य भागवत. दखल न्यूज महाराष्ट्र

